कपाशीच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला, मृत्यूचे कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 05:48 PM2022-11-23T17:48:31+5:302022-11-23T17:49:32+5:30
पिपरी शिवारातील घटना
कन्हान (नागपूर) : पिपरी (ता. पारशिवनी) शिवारातील कपाशीच्या शेतात मंगळवारी (दि. २२) सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास मृत नर बिबट्या आढळून आला. ताे तीन ते चार वर्षांचा असून, त्याच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी दिली.
दामू केवट, रा. पिपरी, ता. पारशिवनी यांची जुनी कामठी रोडलगत शेती असून, शेतात कपाशीचे पीक आहे. महिला मजूर मंगळवारी सकाळी शेतात कापूस वेचणीसाठी गेल्या असता, त्यांना हा बिबट्या जमिनीवर पडून असल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती दामू केवट यांच्यासह इतरांना तर दामू केवळ यांनी वनविभागाला दिली.
माहिती मिळताच रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. हा बिबट्या मृत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वनविभागाचे हरबीर सिंग, उपवन संरक्षक डाॅ. भारतसिंग हाडा, कुंदन हाते, ए.सी. दिग्रसे, वनरक्षक प्रियंका झारखंडे, एस.जे. टेकाम यांनीही घटनास्थळ व परिसराची पाहणी केली. या बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. ते पाेस्टमार्टमनंतर स्पष्ट हाेणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी सांगितले.
वर्षभरात ३० गुरांची शिकार
पिपरी, जुनी कामठी, गाडेघाट, काेळसा खाण क्रमांक- सहा, टेकाडी, वराडा, नांदगाव, बखारी या शिवारात वर्षभरापासून बिबट्याचा वावर आहे. २७ डिसेंबर २०२१ ला गाडेघाट शिवारात बिबट्याचे पहिल्यांदा दर्शन झाले हाेते. त्यानंतर याच भागात नर व मादी बिबट्यांना व नंतर दाेन बछड्यांना फिरताना काही शेतकऱ्यांनी बघितले हाेते. ते बछडे तीन महिन्यांचे असल्याची माहिती पुरुषोत्तम कावळे यांनी दिली. त्यांनी या भागात वर्षभरात ३० गुरांची शिकार केली आहे. या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाने मादी बिबट्यासह तिच्या दाेन बछड्यांना पकडून दूरवर साेडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.