उमरेड-नागपूर महामार्गावर बिबट ठार
By जितेंद्र ढवळे | Published: July 11, 2024 07:03 PM2024-07-11T19:03:41+5:302024-07-11T19:04:05+5:30
Nagpur : चक्रीघाट परिसरात अज्ञात वाहनाची धडक
नागपूर (उमरेड) : उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग एनएच ३५३-डी वरील चक्रीघाट परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाला. बुधवारी (दि.१०) मध्यरात्री १२:१५ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४०३ उपवनक्षेत्र उटी येथील हा अपघात असून, बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी परिसरात सभोवताल जंगल आहे. बिबट रस्ता ओलांडून जात असताना हा अपघात घडला, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
अंदाजे १२ ते १४ महिने वय असलेल्या या बिबट्याच्या डोक्याला, छातीला जबर मार बसला. बरगड्या मोडलेल्या अवस्थेत होत्या. पायालासुद्धा गंभीर दुखापत दिसून आली. या घटनेची माहिती उत्तर उमरेड वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृत बिबट्याचा मौका पंचनामा केला. त्यानंतर मृत बिबट्याचे संपूर्ण शरीर वनपरिक्षेत्र उत्तर उमरेड कार्यालयात आणण्यात आले.
एनटीसीएच्या एसओपीनुसार पशुधन विकास अधिकारी डॉ. विनोद समर्थ, डॉ. मृगाली महाले, डॉ. गिरीश गभणे, डॉ. तेजस माकडे, सहायक वनसंरक्षक मनोज धनविजय, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. डी. बाभळे, योगेश शर्मा, बी. व्ही. लोणारे, ए. के. राऊत, ए. एम. जेंगठे, एम. डी. कोरे, आर. पी. हेडाऊ, आर. एस. नान्हे, एस. एस. सय्यद आदींच्या उपस्थितीत शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मृत बिबट्याचे शव जाळण्यात आले.
काही काळ वाहतूक ठप्प
उमरेड-नागपूर हा महामार्ग २४ तास वर्दळीचा असतो. यामुळे मध्यरात्री १२:१५ वाजताच्या सुमारास अपघात घडल्यानंतर वाहतूक थांबली. काही काळ वाहतूक ठप्प झाली हाेती. दरम्यान, पोलिसांची पेट्रोलिंग चमू घटनास्थळी पोहोचली. त्यांनी वनविभागाला याबाबत सूचना दिली. वनविभागाची चमू तत्काळ घटनास्थळी पोहोचली. लगेच मृतावस्थेत असलेल्या बिबट्याला उमरेड येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. यावेळी बघ्यांची माेठी गर्दी झाली हाेती.