बिबट्या पुन्हा दिसला गोकूळ सोसायटीतच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:55 PM2019-12-10T23:55:06+5:302019-12-10T23:55:50+5:30
गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या गोकुळ सोसायटीमध्ये सोमवार रात्री उशिरा दीपक ठाकरे या मजुराला बिबट्या दिसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या गोकुळ सोसायटीमध्ये सोमवार रात्री उशिरा दीपक ठाकरे या मजुराला बिबट्या दिसला. सोसायटी परिसरातच तो टिन शेडमध्ये राहतो. रात्री १.३० च्या सुमारास त्याला सोसायटी परिसरात आवाज आला. त्यामुळे त्याने दार उघडले असता बाहेर एक बिबट्या सोसायटीच्या इमारतीच्या पार्किंगमधून झाडांकडे जाताना दिसला. बिबट्या गेला याची खात्री केल्यावर काही वेळाने तो हिंमत करून संबंधित इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहचला. तिथे त्याने बिबट्याचे पगमार्क पाहिले.
मंगळवारी सकाळी त्याने सोसायटीमधील नागरिकांना बिबट्यासंदर्भात माहिती दिली. सोसायटीतील सबीर गुप्ता यांनी दीपकने दाखविलेल्या ठिकाणावरून बिबट्याचे पगमार्कचे आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्रण केले.
या पूर्वीही शनिवारी ७ डिसेंबरला सबीर गुप्ता यांना सकाळी ७.३० वाजता मॉर्निंग वॉकवरून परतताना याच परिसरात बिबट्या दिसला होता. मात्र त्या वेळी त्याचे पगमार्क आढळले नव्हते. या संदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. गोकुळ सोसायटी गोरेवाडा वनक्षेत्राला अगदी लागूनच असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर नाकारता येत नसल्याचे वनाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अंबाझरीत रात्री फिरवला ड्रोन
अंबाझरी वनक्षेत्राच्या वाडीला लागून असलेल्या वन क्षेत्रामध्ये सोमवारी रात्री बिबट्या दिसल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यामुळे पथकाने या परिसरात पहाणी केली. रात्री उशिरापर्यंत ड्रोनही या परिसरात फिरविला. मात्र पत्ता लागू शकला नाही. तिकडे, अंबाझरीतील बिबट्याला पकडण्यासाठी वन मुख्यालयाकडे परवानगी मागितली जात आहे. मात्र या प्रक्रियेला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे पिंजरे लावण्यात आलेले नाहीत.
वाघ लोकेशनबाहेरच
मागील चार दिवसांपासून मिहान परिसरातील वाघाचा पत्ता लागलेला नाही. शुक्रवारी ६ डिसेंबरला खडका शिवारातून कान्होलीबारावरून टाकळघाट पर्यंतचा मार्ग पार करून तो टेकडी डोंगरगांव रिठी येथे पोहचला होता. त्यानंतर तो बोर प्रकल्पाच्या दिशेने पुढे निघाल्याचे संकेत वन विभागाला मिळाले होते. मात्र ते खोटे निघाले. शनिवारी तो दुसऱ्यांदा तेल्हारा तलाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून त्याच्या शोधासाठी पथकांची धावाधाव सुरू आहे. अद्यापही त्याचे लोकेशन मिळाले नाही. यापूर्वी तो वारंवार बुटीबोरी वन क्षेत्रच्या खडका, गुमगाव आणि मोंढापर्यंत फिरून पुन्हा मिहान परिसरात परतला होता. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी त्याला ट्रॅक्युलाइज करण्याची तयारी केली होती. यासाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून वाघाला बेशुद्ध करून पकडल्यावर त्याच्या मुळ अधिवासात सोडण्यासाठी मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
वाघाने केली दोन वासरांची शिकार
कुही तालुक्यातील तारणा गावाच्या मांढळ बिट क्षेत्रातील एका शेतामध्ये सोमवारी रात्री वाघाने दोन वासरांची शिकार केली. ही घटना प्रादेशिक क्षेत्राच्या उत्तर उमरेड रेंजच्या कुही तारणा परिसरात रात्री १२ वाजतानंतर घडली. शेतमालक आनंद पडोळे यांनी आपल्या शेतामध्ये दोन वासरे बांधून ठेवली होती. सकाळी येऊन बघीतल्यावर दोन्ही वासरे मृतावस्थेत दिसली. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून आरएफओ घनश्याम ठोंबरे, आरएफओ अंबरलाल मडावी पथकासह पोहचले. घटनास्थळी वाघाचे पगमार्क आढळले. या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावून वाघाचा शोध घेतला जात आहे.