शहर साेडून अंबाझरी उद्यानात परतला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 10:07 PM2021-06-08T22:07:28+5:302021-06-08T22:07:55+5:30
leopard returned शहरतील गायत्रीनगर, आयटी पार्क भागात धूम ठाेकत दहशतीचे कारण ठरलेला बिबट अखेर त्याचे निवास असलेल्या अंबाझरी जैवविविधता उद्यानाच्या वनक्षेत्रात परतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरतील गायत्रीनगर, आयटी पार्क भागात धूम ठाेकत दहशतीचे कारण ठरलेला बिबट अखेर त्याचे निवास असलेल्या अंबाझरी जैवविविधता उद्यानाच्या वनक्षेत्रात परतला. मागील चार-पाच दिवसापासून ताे शहरात आढळून आला नाही. दरम्यान, उद्यानाच्या परिसरात काही दिवसातच चार जंगली वराहाची शिकार झाल्याच्या घटना घडल्या आणि उद्यानाच्या वाॅटर फिल्टर गेट परिसरात लावलेल्या कॅमेऱ्यातही ताे बिबट दिसून आला आहे. त्यामुळे ताे अंबाझरी उद्यानात परतल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.
२८ मे राेजी पहिल्यांदा हा बिबट गायत्रीनगरच्या एनपीटीआयच्या परिसरात राहणाऱ्या दाेन लाेकांना दिसला हाेता. त्यानंतर ताे आयटी पार्कच्या एका साॅफ्टवेअर कंपनीच्या कॅमेऱ्यातही त्याचे अस्तित्व दिसून आले. पुढे ताे बिबट व्हीएनआयटी कॅम्पस, कृषी विद्यापीठाचे गेस्ट हाऊस, महाराजबाग, जुने हायकाेर्ट परिसर व जीपीओ परिसरातही दिसल्याचे दावे करण्यात आले. त्यानुसार वन विभागाने या भागात कॅमेरे लावण्यासह त्याला पकडण्यासाठी पिंजऱ्याचाही बंदाेबस्त केला हाेता. कर्मचारी दिवस-रात्र त्याच्या गस्तीवर हाेते. मात्र यातील एकाही परिसरात त्याचे अस्तित्व किंवा पगमार्क आढळून आले नाही. वनविभागाने अंबाझरी जैवविविधता उद्यानातही २४ कॅमेरे आणि कर्मचाऱ्यांना गस्तीवर तैनात केले हाेते. दरम्यान, २ ते ६ जूनच्या काळात उद्यानात चार जंगली वराहाची शिकार झाल्याची बाब लक्षात आली. उद्यान क्षेत्रात बिबट्याचे पगमार्कही दिसून आले, शिवाय एका कॅमेऱ्यात ताे टिपला गेला. त्यामुळे हा बिबट अंबाझरी उद्यानात गेल्याचे वन विभागाने आज जाहीर केले. मात्र अंबाझरी उद्यानात नेमके किती बिबट आहेत आणि कॅमेऱ्यात दिसलेला हाच बिबट आहे का, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत.
खराेखर दिसल्यास सूचित करा
बिबट अंबाझरी पार्कमध्ये परतल्याचे सांगितले असले तरी वन विभागाने शाेध पथकाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरातील नागरिकांनाही खराेखरच दिसला असेल तर वन विभागाच्या १९२६ या टाेल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.