बापरे! बोरगावच्या गोकुल हाऊसिंग सोसायटीत बिबट्या; नागरिकांत भीतीचे वातावरण
By जितेंद्र ढवळे | Published: October 4, 2023 03:47 PM2023-10-04T15:47:54+5:302023-10-04T15:50:18+5:30
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
नागपूर : पश्चिम नागपुरातील बोरगाव येथील गोकुल हाऊसिंग सोसायटीत बुधवारी पहाटे बिबट्या शिरला. सोसायटीतील कान्हा रिजन्सीतील कुत्र्यांची शिकार करण्यासाठी हा बिबट्या पाठलाग करीत असल्याचा व्हिडीओ बिल्डिंगच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरातील नागरिकांत यामुळे प्रचंड दहशत पसरली आहे.
यापूर्वी गोरेवाडा जंगलाच्या सुरक्षा भिंतीवर लाव्हा आणि गोरेवाडा वस्ती परिसरात बिबट्या दिसला होता. मात्र आता दाट लोकवस्ती असलेल्या गोकुल हाऊसिंग सोसायटीतच बिबट्या शिरल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोकुल हाऊसिंग सोसायटीत किमान ४५ हुन अधिक फ्लॅट स्किम आहेत. याशिवाय सोसायटीच्या बाजूला बोरगाव वस्ती आहे.
गोकुल हाऊसिंग सोसायटीलगत पश्चिम दिशेला मिल्ट्रीचे तारांचे कुंपण आहे. या परिसरात झुडपी जंगल आहे. याशिवाय उत्तर दिशेला गोरेवाडा जंगल आहे. हा बिबट्या शिकारीच्या शोधात मिल्ट्रीच्या ताराच्या कुंपणातून आत शिरला असावा, असा स्थानिकांचा अंदाज आहे. बिबट्या बुधवारी पहाटे ४:१५ वाजता कान्हा रिजन्सीच्या सीसीटीव्हीत कैद झाला. यात तो बिल्डिंगमधील श्वानांचा पाठलाग करीत असल्याचे दिसून आले आहे. स्थानिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली.
गोरेवाडा तलावावर सकाळी आणि सायंकाळी फिरायला (वॉकिंग) जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. काही महिन्यापूर्वी या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने प्रशासनाने नागरिकांना जंगल परिसरात फिरण्यास बंदी घातली होती. मात्र बंदी शिथिल झाल्यानंतर सकाळी आणि सायंकाळी फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. अशात बिबट्याचा दाट लोकवस्तीत वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.