बिबट्याने केली गायीची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:09 AM2021-09-27T04:09:43+5:302021-09-27T04:09:43+5:30
काेंढाळी : शेतातील गुरांवर हल्ला चढवून बिबट्याने एका गायीची शिकार केली. ही घटना काेंढाळी वनपरिक्षेत्रांतर्गतच्या कुंडी शिवारात शनिवारी (दि. ...
काेंढाळी : शेतातील गुरांवर हल्ला चढवून बिबट्याने एका गायीची शिकार केली. ही घटना काेंढाळी वनपरिक्षेत्रांतर्गतच्या कुंडी शिवारात शनिवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
शेतकरी पी. सराेदे यांची कुंडी शिवारात शेती असून, शेतातील गाेठ्यात बांधून असलेल्या गुरांवर बिबट्याने हल्ला करून एका गायीचा फडशा पाडला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या भागात चार दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, गुरांच्या शिकारीच्या घटना वाढल्या आहेत. मागील आठवड्यात मिनीवाडा येथील शेतकऱ्याच्या दाेन गायींची शिकार केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वन विभागाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जि. प. सदस्य रामदास मरकाम, नितीन ठवळे, आकाश गजभिये, प्रशांत खंते यांची केली आहे. तसेच वन विभागाने या भागात ट्रॅप कॅमेरे लावून या बिबट्याचा बंदाेबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.