नागपुरातील अंबाझरी उद्यानात बिबट्याचे पगमार्क आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:22 AM2019-11-29T10:22:15+5:302019-11-29T10:22:41+5:30
मागील तीन महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेल्या शहरालगतच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात गुरुवारी सकाळी बिबटसदृश प्राण्याचे पगमार्क आढळले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील तीन महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेल्या शहरालगतच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात गुरुवारी सकाळी बिबटसदृश प्राण्याचे पगमार्क आढळले आहेत. अगदी शहराच्या जवळ असलेल्या या उद्यानात प्रथमच बिबटसारख्या प्राण्याचा वावर असल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने हे उद्यान पुढील तीन दिवस नागरिकांसाठी बंद ठेवले आहे.
शहराच्या पश्चिमेला असलेल्या या उद्यानामध्ये नागरिक दररोज सकाळी, सायंकाळी फिरायला जातात. नेहमीप्रमाणे गुरुवारी नागरिक फिरायला गेले असता काही जागृत नागरिकांना सकाळी ६.३० वाजता पाणवठ्याच्या परिसरात बिबटसारख्या प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच उद्यानात बिबट असल्याची एकच वार्ता सर्वत्र पसरली. त्यामुळे फिरायला आलेल्या नागरिकांनी येथून काढता पाय घेतला.
वनविभागाला ही माहिती कळताच हिंगणा वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखल होऊन आधी नागरिकांचा प्रवेश थांबविला. तज्ज्ञांनी हे पगमार्क तपासले असता बिबट्याचे असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. ही खात्री होताच वनविभागाने दोन चमू तयार करून परिसरामध्ये शोधमोहिम राबविली. मात्र दाट झाडीझुडपामध्ये त्याचा शोध लागू शकला नाही.
१ डिसेंबरपर्यंत पार्क बंद
सुरक्षेचा उपाय म्हणून १ डिसेंबरपर्यंत पार्क नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी दुपारी घेण्यात आला. प्राण्याचे ठसे नेमके बिबट्याचेच आहेत काय, त्याचे वय आणि वजनही त्याच्या ठशावरून निश्चित करण्यासाठी वन्यजीव अभ्यासक आणि तज्ज्ञांकडून अभ्यास केला जात आहे. त्याच्यावरील निगराणीसाठी परिसरात ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत. वन कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून रोज शोधमोहिम राबविली जाणार असून शहानिशा झाल्यावर हे पार्क सुरू केले जाईल, अशी माहिती नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांनी दिली आहे.
मिहान परिसरातील वाघ दोनदाच कॅमेऱ्यात
मिहान परिसरातील इन्फोसिस कंपनीच्या परिसरात आढळलेला वाघ २७ नोव्हेंबरला कॅमेऱ्यामध्ये दिसून आला होता. त्यापूर्वीही चार दिवसांपूर्वी तो एकदा दिसला होता. त्यानंतर पुन्हा तो कॅमेऱ्यात आला नसला तरी त्याची दहशत कायमच आहे. कंपनीमध्ये कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्येही भीती कायम आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी वनविभाच्या अधिकाऱ्यांनी इन्फोसिस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परिसरात असलेला कचरा आणि लहान झुडपे तोडून साफ करण्याच्या सूचना दिल्या. परिसरात अद्यापही सुमारे ३० च्या जवळपास ट्रॅप कॅमेरे लागलेले आहेत.