नागपूर तालुक्यातील पाच शाळांमध्ये पाचपेक्षाही कमी विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:48 AM2019-05-20T10:48:25+5:302019-05-20T10:49:44+5:30
शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मानस बाळगला आहे. यात सर्वाधिक शाळा काटोल तालुक्यातील बंद होणार आहेत. कारण काटोलमध्ये ४७ शाळेंची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मानस बाळगला आहे. यात सर्वाधिक शाळा काटोल तालुक्यातील बंद होणार आहेत. कारण काटोलमध्ये ४७ शाळेंची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. तर नागपूर तालुक्यात पाच शाळांमध्ये पाचपेक्षा कमी विद्यार्थ्यांचा पट आहे.
शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ३८७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. गेल्या सत्रामध्ये नागपूर जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या २४ शाळा बंद करून त्यातील विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन केले होते. यंदाही पाच हजारावर शाळा बंद करण्याचे सरकारचे टार्गेट आहे. त्याची झळ नागपूर जिल्ह्यालाही बसण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ० ते ५ पट संख्या असलेल्या ३४, ६ ते १० पटसंख्या असलेल्या ९४ व ११ ते १९ पटसंख्या असलेल्या २५९ शाळांचा समावेश आहे. तशा जिल्ह्यात १५५५ शाळा आहेत. शासनाने ठरविलेल्या टार्गेटनुसार शाळा बंद पाडल्यास मोठ्या संख्येने शिक्षिक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे.
शासन स्तरावरूनच होणार शाळा बंद
गत सहा-आठ महिन्यांपूर्वी नागपूर जि.प.च्या शिक्षण विभागाने शिक्षण समितीमध्ये कमी पटसंख्येच्या १०-१२ शाळा बंद करण्याचा मुद्दा ठेवला होता. मात्र, याला जि.प.तील पदाधिकारी-सदस्यांनी विरोध दर्शविल्याची माहिती आहे. २०१७-१८ मध्ये तत्त्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी २४ शाळा बंद केल्या होत्या. त्यानंतर त्याला विरोध झाल्याचे लक्षात घेता शासनाने वर्ष २०१८-१९ मध्ये आपल्या स्तरावरूनच जिल्ह्यातील १६ कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा बंद करताना तो विषय समिती व सर्वसाधारण सभेमध्ये ठेऊन त्याला मान्यता घ्यावी लागते. मात्र, लोकप्रतिनिधीकडून शाळा बंद करण्याला विरोध होतो. त्यामुळे आता शाळा समायोजन करण्यासाठी शासन स्थानिक पातळीवरून प्रयत्न न करता थेट आपल्या स्तरावरूनच हा कार्यक्रम राबविणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.