वॉर्डात लोकसंख्या कमी, पण मतदार अधिक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:02+5:302021-09-02T04:15:02+5:30
आउटर भागातील वॉर्डांचा विस्तार मोठा राहणार - २०११ चीच लोकसंख्या कायम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेची ...
आउटर भागातील वॉर्डांचा विस्तार मोठा राहणार - २०११ चीच लोकसंख्या कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार आहे. सरासरी लोकसंख्येच्या आधारावर नवीन वॉर्डातील मतदार राहतील, परंतु शहरालगतच्या भागातील वॉर्डांची लोकसंख्या कमी, पण मतदार अधिक राहण्याची शक्यता आहे.
२०११च्या जनगणनेनुसार शहरातील लोकसंख्या २४ लाख, ४७ हजार, ४९४ आहे. १५१ वॉर्डांची सरसरी लोकसंख्या गृहीत धरता १६ लाख होते, परंतु मागील १० वर्षांत शहरातील लोकसंख्या ५ लाखांनी वाढली आहे. लोकसंख्या वाढली, परंतु वॉर्डांची संख्या २०१७ मध्ये जी होती, तीच कायम राहण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवीन वॉर्डांची पुनर्रचना करताना, लोकसंख्या १० टक्के कमी अथवा अधिक राहणार आहे. मात्र, शहरालगतच्या भागातील वॉर्डांचा विचार करता क्षेत्रफळ अधिक, पण मतदार कमी अशी परिस्थिती राहण्याची शक्यता काही ज्येष्ठ नगरसेवकांनी वर्तविली.
ओबीसी आरक्षण नसल्याने खुल्या प्रवर्गात अधिक स्पर्धा राहणार आहे. त्यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. १५१ सदस्यांत महिलांसाठी ७६ जागा राखीव राहतील. यात काही वॉर्डातील मातब्बरांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना लगतचा वॉर्ड शोधावा लागणार असल्याने, प्रस्थापितांची चिंता वाढली आहे. त्यात पक्षांतर्गत गटबाजी व नाराजी विचारात घेता, बाजूच्या वॉर्डातून निवडणूक लढल्यास दगाफटका होण्याची भीती आहे.
काँग्रेस, भाजप व बसपा यांसारख्या पक्षांची नागपुरात व्होटबँक आहे. काही वॉर्डांत राष्ट्रवादी, शिवसेना यांचीही व्होटबँक आहे. गतकाळात मुस्लीम लीगसारख्या पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आले होते. मनसेचेही दोन नगरसेवक होते. रिपाइंचे वेगवेगळे गट व इतर पक्षांना त्यांचे अस्तित्व दाखविण्याची ही संधी आहे. एमआयएम जोर लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. वॉर्ड पद्धतीत अपक्ष नगरसेवकांचा बोलबाला राहणार आहे.
...............