जिल्ह्याच्या दौऱ्याकडे पाठ, अभ्यास दौऱ्याचा थाट ! नागपूर जिल्हा दुष्काळाने होरपळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 08:55 PM2019-06-14T20:55:21+5:302019-06-14T20:57:22+5:30
जिल्हा दुष्काळाने होरपळला आहे. पाण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. चाऱ्याच्या टंचाईने शेतकऱ्यांनी जनावरे विकायला काढली आहे. पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागाची अवस्था भीषण झाली आहे. अशा अवस्थेत जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा, लोकप्रतिनिधी स्वस्थ आहे. दुष्काळाचा आढावा नाही, टंचाईचे योग्य नियोजन नाही, खरीप हंगाम तोंडावर असताना बैठका नाही. ग्रामीण भागातील जनता दुष्काळामुळे मेटाकुटीस आली असतानाही, दौरेसुद्धा केले जात नाही. जिल्ह्यात निर्माण झालेल्या अशा भीषण परिस्थितीत आता जि.प.च्या सदस्यांचे अभ्यास दौरे काढले जात आहे. त्याची चर्चा आता रंगायला लागली आहे. जिल्ह्याकडे पाठ आणि अभ्यास दौऱ्याचा कसला थाट, अशी ओरड आता ग्रामीण जनतेतून होऊ लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा दुष्काळाने होरपळला आहे. पाण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. चाऱ्याच्या टंचाईने शेतकऱ्यांनी जनावरे विकायला काढली आहे. पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागाची अवस्था भीषण झाली आहे. अशा अवस्थेत जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा, लोकप्रतिनिधी स्वस्थ आहे. दुष्काळाचा आढावा नाही, टंचाईचे योग्य नियोजन नाही, खरीप हंगाम तोंडावर असताना बैठका नाही. ग्रामीण भागातील जनता दुष्काळामुळे मेटाकुटीस आली असतानाही, दौरेसुद्धा केले जात नाही. जिल्ह्यात निर्माण झालेल्या अशा भीषण परिस्थितीत आता जि.प.च्या सदस्यांचे अभ्यास दौरे काढले जात आहे. त्याची चर्चा आता रंगायला लागली आहे. जिल्ह्याकडे पाठ आणि अभ्यास दौऱ्याचा कसला थाट, अशी ओरड आता ग्रामीण जनतेतून होऊ लागली आहे.
हे अभ्यास दौरे महिला बालकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन विभागाचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महिला बालकल्याण विभागातर्फे कर्नाटक येथे अभ्यास दौरा जाणार आहे. हा दौरा फक्त महिला सदस्यांसाठी आहे. तर पाणी पुरवठा स्वच्छता मिशनतर्फे कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग येथील ग्रामपंचायतींची पाहणी करण्यासाठी दौरा काढण्यात येणार आहे. यात सर्व सदस्यांचा समावेश आहे. महिला बालकल्याण विभागाचा दौरा आटोपल्यावर सर्व सदस्य कोल्हापूरला पोहचून, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा दौरा करणार आहे. याकरिता आवश्यक तयारी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर यांच्या कक्षात अधिकाऱ्यांची मॅराथॉन बैठक झाली.
पण जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी स्थिती आहे. टँकरमध्येही वाढ करण्यात आली नाही. मान्सून लांबला अूसन टंचाईचे अद्याप काम पूर्ण झाले नाही. टंचाईवर विशेष बैठक घेण्याचे आश्वासन मागील सर्वसाधारण अध्यक्षांनी दिले होते. महिनाभराचा कालावधी होत असताना अद्याप बैठक झाली नाही. दुष्काळी भागाचा दौरा केला नाही. फक्त बोअरवेल होत नसल्याची ओरड होत आहे. टंचाईच्या इतर कामावर सदस्य शब्दच काढत नाही. मान्सून लांबल्याने ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट होणार असल्याचे सांगण्यात येते. अशातच जिल्हा परिषदेतील संपूर्ण सदस्य अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. विरोधी पक्षांनी या अभ्यास दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे.
दुष्काळाच्या परिस्थितीत अभ्यास दौरे काढणे चुकीचे आहे. यासंदर्भात आमच्या सदस्यांशी चर्चा करून, या दौऱ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेऊ.
मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते, काँग्रेस
दुष्काळाची भीषणता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे दौरे करणे गरजेचे आहे. शेतीचा हंगाम तोंडावर आहे. शाळा सुरू होत आहेत. पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. असा परिस्थितीत दौरे करण्यापेक्षा दौऱ्याचे पैसे शेतकऱ्यांना अनुदान म्हणून द्यावे. मला या दौऱ्याबद्दल कल्पना नाही आणि मी जाणारही नाही.
चंद्रशेखर चिखले, सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा असे दौरे काढत असेल, तर दौऱ्याला आमचा विरोध राहील. आम्ही शिवसेनेच्या सर्व सदस्यांना दौऱ्यात सहभागी न होण्याचे आवाहन करणार.
संदीप इटकेलवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना