आठ आण्याचा ऑक्सिजन अन् बारा आण्याचे वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 12:42 PM2022-01-25T12:42:47+5:302022-01-25T12:52:45+5:30
कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत ४ ते ५ टक्केच रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची व ३ ते ४ टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज पडत असल्याने या प्लांटचा फारसा उपयोग होत नसल्याच्या चर्चेला आता पेव फुटले आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनीच जाणले. यामुळे तिस-या लाटेचा धोका ओळखून कोट्यवधी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभे करण्यात आले. परंतु ऑक्सिजनचे रुग्ण कमी असल्याने व त्यावरील विजेचा खर्च मोठा असल्याने हे प्लांट टिनाच्या शेडमध्ये शोभेच्या वस्तू ठरण्याची दाट शक्यता आहे.
कोरोनाची दुसरी लाट भयावह ठरली. या लाटेत एका रुग्णास दर मिनिटाला कमीतकमी १०, तर जास्तीतजास्त ७० लीटरपर्यंत ऑक्सिजन लागत होता. ९५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली होती. यामुळे मोठा तुटवडा पडला. इतर राज्यांतून ऑक्सिजन आणण्याची वेळ आली. पुन्हा तीच स्थिती निर्माण होऊ नये म्हणून नागपूर विभागात ‘पीएसए’चे २६ प्लांट निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून जवळपास ४७.१४ मेट्रिक टन ऑक्सिजनची मदत होणार होती. परंतु, कोरोनाच्या या तिस-या लाटेत ४ ते ५ टक्केच रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची व ३ ते ४ टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज पडत असल्याने या प्लांटचा फारसा उपयोग होत नसल्याच्या चर्चेला आता पेव फुटले आहे. काही खासगी हॉस्पिटलने लावलेले ‘पीएसए’ प्लांट विजेचा बिलाला परडवत नसल्याने बंद केले आहेत.
-ऑक्सिजनचे १०० रुग्ण असतील तरच परवडणारा
ऑक्सिजनचे व्यवस्थापन करणा-या एका तज्ज्ञाने सांगितले, एक ‘पीएसए’ प्लांटला उभे करण्यापासून ते त्याच्या टीनच्या शेड बांधण्याला व विद्युतव्यवस्थेची सोय करण्याला सुमारे १ कोटी रुपयांचा खर्च लागतो. हा प्लांट चालविण्यासाठी ऑक्सिजनचे गरज असलेले १०० रुग्ण असणे गरजेचे आहे. त्यांची संख्या कमी असल्यास हा प्लांट चालविणे विजेचा खर्चाला परडवणारे नाही. कारण, शासकीय रुग्णालयांना शासकीय दरात वीज मिळत असली, तरी या रुग्णालयांना एका प्लांटचा विद्युतखर्च २ ते ३ लाख, तर खासगी रुग्णालयांना हाच खर्च ५ ते ६ लाख रुपये येणार आहे.
-सिलिंडर रिफील होण्याचीही सोय नाही
सध्या तरी शासकीय रुग्णालयात लावण्यात आलेल्या ‘पीएसए’ प्लांटमध्ये ‘सिलिंडर रिफील’ करण्याची सोय नाही. ऑक्सिजनवरील रुग्ण कमी असल्यास या प्लांटचा विद्युतखर्च भागविण्यासाठी ही सोय असणे गरजेचे होते. बाजारात ऑक्सिजन सिलिंडर रिफीलिंग करण्याचा खर्च २५० ते ३०० रुपये आहे.
-‘पीएसए’ ऑक्सिजनचा उपयोग केवळ सामान्य रुग्णांना
‘पीएसए’मधून तयार होणा-या ऑक्सिजनचा दाब कमीजास्त होत राहतो. यामुळे व्हेंटिलेटर किंवा आयसीयूमध्ये असणा-या गंभीर रुग्णांना हा ऑक्सिजन देणे धोक्याचे ठरू शकते. या रुग्णांना स्टोअर केलेला लिक्विड ऑक्सिजन दिला जाताे, तर सामान्य वॉर्डात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना ‘पीएसए’चा ऑक्सिजन दिला जातो.
-प्लांट चालवण्यापेक्षा ऑक्सिजन सिलिंडर विकत घेणे परवडते
एका खासगी रुग्णालयाच्या संचालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, ज्या खासगी रुग्णालयात ५० पेक्षा जास्त खाटा असतील, त्यांनी स्वत:चा ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. यामुळे लाखो रुपये खर्च करून ‘पीएसए’ प्लांट लावला. परंतु, याचा विजेचा दरमहा खर्च ६ लाखांवर जात असल्याने प्लांट बंद करावा लागला. हा प्लांट चालवण्यापेक्षा ऑक्सिजन सिलिंडर विकत घेणे परवडत असल्याचेही ते म्हणाले.
-‘पीएसए’ प्लांटची स्थिती
रुग्णालय : प्लांटची संख्या
मेडिकल : ३
मेयो : २
एम्स : ३
किंग्जवे हॉस्पिटल : १
विवेका हॉस्पिटल : १
साई राधाक्रिष्ण हॉस्पिटल : १
आर्चएंजल हॉस्पिटल उमरेड : १
लाइफलाइन हॉस्पिटल : १
आयुष्यमान हॉस्पिटल, कामठी : १
सीटी हॉस्पिटल : १
सीम्स हॉस्पिटल : १
सेवन स्टार हॉस्पिटल : १
ऑरेंज सिटी हॉस्पिटल : १
सेंटर पॉइंट हॉस्पिटल : १
उपजिल्हा रुग्णालय, कामठी : २
मनपा आयसोलेशन हॉस्पिटल : १
मनपा केटीनगर हॉस्पिटल : १
नागपूर विद्यापीठ : १
मनपा इंदिरा गांधी हॉस्पिटल : १
आयुष हॉस्पिटल : १
रेल्वे हॉस्पिटल : १
मिलिटरी हॉस्पिटल : १