छळ करणाऱ्या मुलाला आईने शिकविला धडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:35 PM2017-11-28T13:35:40+5:302017-11-28T13:42:05+5:30
जन्मदात्या आईची सेवा करणे प्रत्येक मुलाचे कर्तव्य असते. परंतु, एखादा मुलगा हे कर्तव्य विसरून आईचा अमानुषरीत्या छळ करीत असेल तर, त्याला धडा शिकविणे आवश्यक होऊन जाते. एका लढवय्या आईने तसेच केले. तिने कायद्याच्या मार्गाने हक्काची लढाई लढून मुलाला घर खाली करण्यास लावणारा आदेश मिळविला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : जन्मदात्या आईची सेवा करणे प्रत्येक मुलाचे कर्तव्य असते. परंतु, एखादा मुलगा हे कर्तव्य विसरून आईचा अमानुषरीत्या छळ करीत असेल तर, त्याला धडा शिकविणे आवश्यक होऊन जाते. एका लढवय्या आईने तसेच केले. तिने कायद्याच्या मार्गाने हक्काची लढाई लढून मुलाला घर खाली करण्यास लावणारा आदेश मिळविला. संबंधित घर आईने स्वत:च्या मिळकतीतून बांधले असून त्यावर मुलाने त्याच्या कुटुंबासह बळजबरीने कब्जा केला होता.
कांताबाई साखरे (६१) असे आईचे नाव असून त्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. नवीन जरीपटक्यातील कीर्तिधर सोसायटीत त्यांचे घर आहे. कांताबाई यांनी घराचा पूर्ण ताबा मिळण्यासाठी ‘आई, वडील व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम-२००७’मधील कलम ५ अंतर्गत निर्वाह न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने त्यांचा अर्ज मंजूर करून मुलगा महेश व त्याच्या कुटुंबीयांना एक महिन्यात घर खाली करण्याचा आदेश दिला आहे. महेश व त्याच्या कुटुंबीयांनी कांताबाई यांच्या इच्छेविरुद्ध घरात प्रवेश केला आहे. त्यांचे वर्तन व वागणूक कांताबाई यांना त्रासदायक ठरत आहे. कांताबाई यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे असे निरीक्षण न्यायाधिकरणने हा निर्णय देताना नोंदविले आहे.
कांताबाई यांना महेशसह तीन मुले व एक मुलगी आहे. ते सर्वजण आपापल्या कुटुंबासह वेगवेगळे रहात होते. दरम्यान, २०१६ मध्ये महेश व त्याच्या कुटुंबीयांनी बळजबरीने कांताबाई यांच्या घरात प्रवेश केला. तसेच, हॉल, किचन व बेडरुमचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी समाधानाने राहायचे सोडून कांताबाईला त्रास देणे सुरू केले. ते कांताबाईला मारहाण करून घरातून हाकलून देण्याची धमकी देत होते. परिणामी, कांताबाई यांनी जरीपटका पोलीस ठाण्यामध्ये पाचवेळा तक्रारी नोंदविल्या. परंतु, तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायाधिकरणात धाव घेतली होती. महेश व त्याच्या कुटुंबीयांनी स्वत:ची बाजू स्पष्ट करताना कांताबाईचे आरोप फेटाळून लावले होते. परंतु, उपलब्ध पुराव्यांवरून न्यायाधिकरणने कांताबाईला दिलासा दिला.