आयएमए देणार ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:03 PM2019-04-18T23:03:36+5:302019-04-18T23:05:28+5:30

२४ तास नागरिकांच्या सेवेत असलेल्या विशेषत: पोलिसांना ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चे धडे देण्यात येईल. सोबत सामान्य नागरिकांनाही याचे प्रशिक्षण देण्यात येईल. अचानक हृदय बंद पडणाऱ्यांना जीवनदानाचा हा एक प्रयत्न असेल, अशी माहिती ‘आयएमए’चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Lessons of 'Basic Life Support' by IMA | आयएमए देणार ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चे धडे

डॉ. कुश झनझुनवाला आणि डॉ. मंजुषा गिरी

Next
ठळक मुद्देपोलिसांना देणार प्रशिक्षण : ‘आयएमए’चा पदग्रहण सोहळा रविवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २४ तास नागरिकांच्या सेवेत असलेल्या विशेषत: पोलिसांना ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चे धडे देण्यात येईल. सोबत सामान्य नागरिकांनाही याचे प्रशिक्षण देण्यात येईल. अचानक हृदय बंद पडणाऱ्यांना जीवनदानाचा हा एक प्रयत्न असेल, अशी माहिती ‘आयएमए’चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्या नवनियुक्त सचिव डॉ. मंजुषा गिरी, मावळते अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, मावळते सचिव डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. यशवंत देशपांडे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. कृष्णा पराते, डॉ. वंदना काटे आदी उपस्थित होते.
डॉ. झुनझुनवाला म्हणाले, अचानक हृदय बंद पडून खाली कोसळणाऱ्या व्यक्तीला आपण पाहतो. अशा व्यक्तीला तातडीने म्हणजे ‘गोल्डन अवर्स’मध्ये प्रथमोपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो. याच उपक्रमाला व्यापक करण्यासाठी यावर्षी ‘आयएमए’ पुढाकार घेणार आहे. ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चे प्रशिक्षण पोलिसांच्या परिमंडळानुसार त्यांना देण्यात येईल. पुढील आठ महिन्यात जास्तीत जास्त पोलिसांना याचे धडे दिले जातील. यानंतर राज्य राखीव पोलीस दल, अग्निशमन दल आणि नागपूर ग्रामीण पोलिसांसोबतच सामान्य नागरिकांनाही याचे प्रशिक्षण दिले जाईल. या उपक्रमासोबतच अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मदतीने ‘इट इंडिया राईट’ हा उपक्रम हाती घेतला जाईल. यात कमी साखर, कमी तेल व कमी मीठ खाण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
‘आयएमए’च्या सर्व माजी अध्यक्षांचा ‘प्रेसिडेंट क्लब’ तयार करण्यात आला आहे. ‘फेडरेशन आॅफ मेडिकल असोसिएशन’च्यावतीने (फोमा) इतर वैद्यकीय संघटनांना या व्यासपीठावर एकत्र आणले जाईल. ‘सिटीझन-डॉक्टर फोरम’ तयार केला जाणार आहे. ‘पब्लिक फोरम’ही तयार करण्यात आला आहे,असेही डॉ. झुनझुनवाला यांनी सांगितले.
डॉ. दिसावल म्हणाले, नव्या कार्यकारिणीचे पदग्रहण रविवारी २१ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता आएमए सभागृहात होईल. या प्रसंगी आ. डॉ. मिलिंद माने, ‘मॅट’चे प्रमुख न्यायधीश अंबादास जोशी, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, आयएमएचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. हुजी कपाडिया उपस्थित राहतील.
अशी आहे नवी कार्यकारिणी
डॉ. कुश झनझुनवाला (अध्यक्ष), डॉ. प्रकाश देव व डॉ. रफात खान (उपाध्यक्ष), डॉ. मंजुषा गिरी (सचिव), डॉ. अर्चना देशपांडे व डॉ. अनिरुद्ध देवके (सहसचिव), डॉ. आलोक उमरे (कोषाध्यक्ष) पुढील वर्षाच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी.

Web Title: Lessons of 'Basic Life Support' by IMA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.