विद्यापीठात मोफत शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:49 AM2017-08-11T01:49:40+5:302017-08-11T01:50:27+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने शहीद जवान तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना दिलासा देण्याचे ठरविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने शहीद जवान तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना दिलासा देण्याचे ठरविले आहे. अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर विभागांमध्ये मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला गुरुवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. पुढील शैक्षणिक सत्रापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले की, विदर्भातील शेतकºयांची आत्महत्या अद्यापही थांबलेली नाही. आत्महत्या केलेल्या काही शेतकºयांची मुले विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना आर्थिक तंगीमुळे विविध अडीअडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांचे विद्यापीठातील सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांतर्फे अनेक दिवसांपासून होत होती. सोबतच जवान देशासाठी शहीद होतात. त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. सामाजिक जाणिवेतूनच शहीद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचादेखील प्रस्ताव होता.
यासंदर्भात गुरुवारी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. विद्यापीठाच्या सर्व पदव्युत्तर विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांत शहीद जवान किंवा आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.
पुढील सत्रापासून अंमलबजावणी
विभागांमध्ये विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क घेण्यात येणार नाही. तर संलग्नित महाविद्यालयांत त्यांनी प्रवेश घेतला तर त्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येईल. २०१७-१८ चे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे हा निर्णय पुढील शैक्षणिक सत्रापासून अमलात आणल्या जाईल. याबाबत लवकरच अधिसूचना जारी करण्यात येईल.
- डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू