पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवा!
By admin | Published: May 15, 2016 02:40 AM2016-05-15T02:40:40+5:302016-05-15T02:40:40+5:30
आम्ही पाणी या समस्येचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. त्यामुळे आजचे संकट ओढवले आहे.
लोकमत जलमित्र अभियान : जलतज्ज्ञ के. के. मराठे यांचा सल्ला
नागपूर : आम्ही पाणी या समस्येचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. त्यामुळे आजचे संकट ओढवले आहे. मागील ५० वर्षांतील पावसाची आकडेवारी पाहता, पाऊस हा कधीच कमी पडलेला नाही. केवळ त्याचे चक्र बदलले आहे. वेळापत्रकात गडबड झाली आहे. पाऊस हा लहरी झाला आहे. त्यामुळे तो कधी एकाच दिवशी धो-धो पडतो आणि पुढील संपूर्ण महिना कोरडा जातो. यावर जल व्यवस्थापन हाच एकमेव पर्याय असून, त्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याची गरज आहे. असे मत जलतज्ज्ञ के. के. मराठे यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’ ने राज्यभरात सुरू केलेल्या ‘जलमित्र’ अभियानातर्गंत मराठे यांची खास मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान मराठे यांनी ‘लोकमत’ च्या अभियानाचे कौतुक सुद्धा केले. ते पुढे म्हणाले, धो-धो कोसळणारा पाऊस जमिनीत मुरत नाही. पावसाचे सर्व पाणी नदी-नाल्यांमधून वाहून जाते. त्या पाण्यासोबत माती सुद्धा वाहून जाते. त्यामुळे ते सर्व पाणी अडवून त्याला जमिनीत जिरविणे, आज काळाची गरज ठरली आहे. त्यासाठी ‘माथा ते पायथा’ ही सर्वोत्तम शास्त्रोक्त पद्घत आहे. याच पद्घतीचा उपयोग करून सेंटर फॉर रुरल वेलफेअर, या संस्थेने मागील १९९७-९८ मध्ये राज्यभरात इंडो-जर्मन पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबविला होता. त्यात विदर्भातील सुमारे २५ पेक्षा अधिक गावांचा समावेश होता. आज त्या सर्व गावात मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. परंतु दुर्दैवाने तो कार्यक्रमच ठप्प पडला आहे. या कार्यक्रमात पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या मार्गात खंदकासारखे मोठमोठे खड्डे तयार करून, पाणी अडविल्या जाते. शिवाय शिवारातील दगडांचा उपयोग करून बांध तयार केला जातो. यानंतर नदीनाल्यांचे खोलीकरण केल्या जाते. यातून पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरत असल्याचा विश्वास यावेळी मराठे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)