युगच्या मारेकऱ्यांना फाशीच द्या

By admin | Published: February 4, 2016 02:49 AM2016-02-04T02:49:39+5:302016-02-04T02:49:39+5:30

युग चांडक या आठ वर्षीय निष्पाप आणि असहाय्य बालकाचा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ होता. समाज मन सुन्न करणारी घटना होती.

Let the executioners of the ages be hanged | युगच्या मारेकऱ्यांना फाशीच द्या

युगच्या मारेकऱ्यांना फाशीच द्या

Next

सरकार पक्षाचा युक्तिवाद, आज फैसला
नागपूर : युग चांडक या आठ वर्षीय निष्पाप आणि असहाय्य बालकाचा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ होता. समाज मन सुन्न करणारी घटना होती. त्यामुळे दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, असा जोरदार युक्तिवाद सरकार पक्षाच्या वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या भरगच्च न्यायालयात केला.

अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी पुढे म्हणाल्या की, आरोपींच्या कमी वयाच्या मुद्यावरून शिक्षा ठरवली जाऊ शकत नाही. आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून खंडणीसाठी अपहरण करून निर्घृणपणे खून केलेला आहे. भादंवि ३०२ आणि ३६४-अ या कलमांमध्ये जन्मठेप आणि फाशी या दोन्ही शिक्षांचे प्रावधान आहे. त्यामुळे फाशीचीच शिक्षा देण्यात यावी. आरोपीचे वय कमी असले तरी गुन्ह्याचा प्रकार दुर्मिळात दुर्मिळमध्ये मोडत असेल तर फाशीची शिक्षाच योग्य आहे, असेही सरकार पक्ष म्हणाला. सरकार पक्षाने सुंदरविरुद्ध राज्य सरकार, विक्रमसिंगविरुद्ध पंजाब सरकार, अनिलविरुद्ध राज्य सरकार, पुंडलिकविरुद्ध राज्य सरकार आणि राजूविरुद्ध राज्य सरकारप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांचे दाखले दिले.
राजेश धनालाल दवारे (२०) रा. वांजरी ले-आऊट कळमना आणि अरविंद अभिलाष सिंग (२४) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका, अशी आरोपींची नावे आहेत. ३० जानेवारी रोजीच न्यायालयाने दोघांविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याचे जाहीर केले होते.

फाशी देऊ नका
प्रारंभी न्यायालयाने या दोन्ही आरोपींना पिंजऱ्यात बोलावले. एकेकाला प्रश्न विचारला. तुम्हाला सांगितले होते की, भारतीय दंड विधानाच्या कलम १२०-ब, ३६४-अ आणि ३०२ अन्वये दोष सिद्ध झालेला आहे. या कलमांपैकी ३६४-अ आणि ३०२ मध्ये फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेचे प्रावधान आहे. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे ? आरोपी राजेश दवारे हा काहीही बोलला नाही. त्याचे वकील अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल आपला युक्तिवाद करताना म्हणाले की, हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळचे नाही. आरोपीचे वय कमी आहे. हा त्याचा पहिलाच गुन्हा आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे फाशीची शिक्षा न देता जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी. न्यायालयाने आरोपी अरविंद सिंग यालाही सारखाच प्रश्न विचारला. त्यावर तो म्हणाला की, ‘आपको जैसा लगता है’. मी कोणताही गुन्हा केला नाही. त्याचे वकील अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय आपला यक्तिवाद करताना म्हणाले की, हा आरोपी या गुन्ह्यातील ‘मास्टर मार्इंड’ नाही. त्याचे वय कमी आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो गरीब घरचा आहे. तो समाजासाठी धोकादायक नाही. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावणे योग्य होणार नाही, असेही अ‍ॅड. उपाध्याय म्हणाले. यावेळी बचाव पक्षाने मच्छीसिंग, बच्चनसिंग आणि संतोषकुमार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांचा दाखला दिला. न्यायालयाने सरकार पक्ष आणि बचाव पक्षांचा युक्तिवाद ऐकून उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता निर्णय दिला जाईल, असे जाहीर केले. न्यायालयात सरकार पक्षाला साहाय्य म्हणून फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्या वतीने काम पाहणारे अ‍ॅड. राजेंद्र डागा, अ‍ॅड. मनोज दुल्लरवार, बचाव पक्षाला साहाय्य करणारे अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय, अ‍ॅड. राजेश्री वासनिक उपस्थित होते.

Web Title: Let the executioners of the ages be hanged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.