ज्येष्ठांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजकार्यासाठी होऊ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:10 AM2021-08-23T04:10:29+5:302021-08-23T04:10:29+5:30
नागपूर : ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. जुन्या पिढीने अनुभवातून आयुष्य आणि समाज घडविला आहे. त्यांच्या ...
नागपूर : ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. जुन्या पिढीने अनुभवातून आयुष्य आणि समाज घडविला आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजकायार्साठी आणि कुटुंबातही होऊ द्या, असे आवाहन वरिष्ठ नागरिक परिसंघाच्यावतीने आयोजित जागतिक वरिष्ठ नागरिक दिन समारंभात रविवारी करण्यात आले.
वरिष्ठ नागरिक परिसंघ विदर्भ प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला महामंत्री वसंत पिंपळापुरे, भामसंघाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र हिंमते, विदर्भ महामंत्री सुधीर डबीर, कोषाध्यक्ष चंद्रकांत देशपांडे उपस्थित होते.
भामसंचे महामंत्री विनयकुमार सिन्हा यांनी ज्येष्ठ नागरिकांना मान सन्मानाने जीवन जगू द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, मुलांनी वृद्ध आईवडिलांना आयुष्यात योग्य स्थान व सन्मान दिला पाहिजे. त्यांच्या सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकाराचे हनन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. वसंत पिंपळापुरे म्हणाले, भारतात २०११ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार वरिष्ठ नागरिकांची संख्या १०.४० कोटी होती. त्यात महिला ५.३ कोटी तर पुरूष ५.१ कोटी होते. वर्ष २०२६ पर्यंत ही संख्या २० कोटी झालेली असेल. हा एक मोठा अनुभवी वर्ग आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग समाजकार्यासाठी होऊ शकतो.
भामसंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश्वर राव यांनी जेष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचे दायित्व केंद्र आणि राज्य सरकारने प्रामाणिकपणे पार पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. रवींद्र हिमते यांनी समारोपिय मार्गदर्शन केले. संचालन सुधीर डबीर यांनी तर आभार चंद्रकांत देशपांडे यांनी मानले.