दिशाच्या हत्याऱ्यांना फाशीची शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 01:01 AM2019-12-03T01:01:28+5:302019-12-03T01:03:17+5:30
हैदराबादमधील व्हेटरनरी डॉक्टर दिशा हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हैदराबादमधील व्हेटरनरी डॉक्टर दिशा हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करून आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
हैदराबाद येथील व्हेटरनरी डॉक्टर दिशा हिच्यावर असामाजिक तत्त्वांनी अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत असताना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला. संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने संविधान चौकात गोळा झाले. त्यांनी मेणबत्त्या पेटवून डॉ. दिशा हिला आदरांजली वाहिली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘बलात्कार करणाऱ्यांना फाशी द्या, ‘जय श्रीराम’, ‘देश का बल बजरंग दल’, ‘नारीयों के सन्मान मे बजरंग दल मैदान मे’ आदी घोषणा देऊन या घटनेतील आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांनी अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी बोलताना प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी पाश्चात्य संस्कृतीपासून दूर राहण्याची गरज असल्याचे सांगून, महिलांच्या सन्मानासाठी युद्ध झालेल्या देशात महिलांवर अत्याचार होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. आंदोलनात महानगर मंत्री प्रशांत तितरे, महानगर उपाध्यक्ष अमित बेंबी, बजरंग दलाचे सहसंयोजक विशाल पुंज, लखन कुरील, ऋषभ अरखेल, प्रजापती रंगलाल, सोनू ठाकूर, शुभम अरखेल, बिट्टू सावरिया, सूरज दुबे, सौरभ शाहू यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.