जुन्या पुस्तक विक्रेत्यांना सीताबर्डीत गाळे बांधून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:12 AM2021-08-18T04:12:22+5:302021-08-18T04:12:22+5:30
नागपूर : सीताबर्डीतील मॉरिस कॉलेज टी-पॉईंट परिसरातील जुन्या पुस्तक विक्रेत्यांना सीताबर्डी परिसरातच २८ गाळे त्वरित बांधून द्यावे, अशी मागणी ...
नागपूर : सीताबर्डीतील मॉरिस कॉलेज टी-पॉईंट परिसरातील जुन्या पुस्तक विक्रेत्यांना सीताबर्डी परिसरातच २८ गाळे त्वरित बांधून द्यावे, अशी मागणी नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थेतर्फे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष नरेश वाहाणे यांनी सांगितले, या परिसरात गेल्या ८० वर्षांपासून जुन्या पुस्तक विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू होता. गरीब विद्यार्थ्यांसह इतर गरजू लोक या पुस्तकांचा लाभ घेत होते. मात्र मागील दोन दशकाच्या अधिक काळापासून जुन्या पुस्तक विक्रेत्यांना प्रशासनाच्या कारवाईमुळे भीतीग्रस्त वातावरणात व्यवसाय करावा लागत होता. कधी शहराचे सुशोभिकरण, कधी रहदारीला अडथळा होण्यास तर कधी पार्किंगची व्यवस्था करण्याच्या नावाखाली प्रशासनाकडून त्रास देण्यात येत होता. त्यामुळे पुस्तक विक्रेते नेहमी भीतीच्या सावटाखाली व्यवसाय करीत होते. तेव्हापासूनच नागपूर महानगरपालिका व शासनाकडे पर्यायी स्थायी स्वरूपाची जागा देण्याची विनंती करण्यात येत आहे. सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, पण या समस्येचे निराकरण कुणीही केले नाही. आता तर मागील चार वर्षांपासून मेट्रो रेल्वेचे काम काढून आम्हाला या जागेवरून पूर्णत: निष्कासित करण्यात आले आहे. त्यामुळे मागील चार वर्षांपासून निराश्रिताप्रमाणे कसातरी व्यवसाय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, यात अनेकांचा आता व्यवसाय बुडाला आहे. उदरनिर्वाहाचे साधन गेल्याने गेल्या चार वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली.