सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
By निशांत वानखेडे | Published: September 22, 2024 04:25 PM2024-09-22T16:25:11+5:302024-09-22T16:25:25+5:30
रामदास आठवले यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान
नागपूर : चाैथ्यांदा आमचे सरकार येईल, असे आठवले यांनी म्हटले आहे. आमची सत्ता येईल की नाही माहिती नाही, पण सत्ता कुणाचीही आली तर आठवले यांची जागा पक्की आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका कार्यक्रमात व्यक्त केले.
नितीन गडकरी यांच्याहस्ते मारवाडी फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा २०२४ चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार रविवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना प्रदान करण्यात आला. चिटणवीस सेंटर येथे आयाेजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात माजी खासदार प्रदीन गांधी, मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, अतुल काेटेचा, श्रीकृष्ण चांडक, सुधीर बाहेती आदी मान्यवर उपस्थित हाेते. गडकरी म्हणाले, दलित शोषित समाजाला न्याय देण्याचं काम रामदास आठवले यांनी केले असून दलित चळवळीच रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी आठवलेंनी पुढाकार घेतल्याचे गाैरवाेद्गार काढले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर, दिल्ली येथील स्मारक आणि मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवरील स्मारकासाठी रामदास आठवले यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांचे सामाजिक आणि राजनीती कार्य हे मोठे आहे असे देखील गडकरी यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन शुभदा फडणवीस यांनी केले.
माेदींकडे आहे सत्तेत येण्याचे तंत्र : आठवले
सत्काराला उत्तर देताना रामदास आठवले यांनी, नरेंद्र माेदी यांच्याकडे सत्तेत येण्याचे तंत्र माहिती असल्याने आम्ही चाैथ्यांदा सरकार बनवू, असा दावा केला. मी चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता असून त्याच शैलीत बाेलायलाही आवडते. हीच शैली लाेकांनाही आवडत असल्याने माझे सर्व समाजाच्या नेत्यांशी नाते आहे. केवळ आपला समाज नाही तर सगळा समाज, देश जाेडला पाहिजे, ही बाबासाहेबांची भावना हाेती व त्यानुसारच मी काम करीत असल्याचे ते म्हणाले. डाॅ. बाबासाहेबांच्या अथक संघर्षातून आम्ही माेठ्या पदावर जावू शकलाे. आरक्षणाने समाजाचा फायदा झाला, मराठा समाजालाही आरक्षणाचे समर्थन करीत असल्याचे ते म्हणाले. बाैद्ध समाजात सर्वांना प्रमुख नेता व्हायचे आहे, कार्यकर्ता हाेणे कुणालाही आवडत नाही, त्यामुळे एकत्रिकरण करण्याच्या नावाने रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आजही एकत्र येण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.