शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या : शरद निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:59 PM2019-01-20T22:59:29+5:302019-01-20T23:07:07+5:30
शासनाच्या लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी संत्र्याबाबत विविध प्रकारचे संशोधन केले आहे. ते संशोधन अतिशय चांगले असून लाभदायक आहेत. त्याचा वापर झाल्यास संत्रा हा जगभरात पोहोचेल. तसेच शेतकरीही समद्ध होतील,तेव्हा हे संशोधन संस्थेपुरते मर्यादित न राहता ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाच्या लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी संत्र्याबाबत विविध प्रकारचे संशोधन केले आहे. ते संशोधन अतिशय चांगले असून लाभदायक आहेत. त्याचा वापर झाल्यास संत्रा हा जगभरात पोहोचेल. तसेच शेतकरीही समद्ध होतील,तेव्हा हे संशोधन संस्थेपुरते मर्यादित न राहता ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर यांनी येथे केले.
वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल अंतर्गत रेशीमबाग मैदानात रविवारी तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय कृषी अनुसंधान केंद्रांतर्गत असलेल्या राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या विविध शस्त्रज्ञांनी संत्र्याबाबत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
डॉ. निंबाळकर यांनी नवनवीन संशोधनाचा वापर करून शेतकऱ्यांनी आपली उत्पादकता वाढवावी, असे आवाहनही केले.
उत्पादन वाढवले उत्पादकता वाढवण्याची गरज - एम.एस. लदानिया
यावेळी राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी संत्रा उद्योग यावर मार्गदर्शन केले. त म्हणाले, संत्रा उत्पादनात भारत हा जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्पादन वाढले असले तरी उत्पादकता वाढवण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे हायटेक तंत्रज्ञानाकडे वळण्याची आवश्यकता आहे.
मृदा आरोग्य कार्ड आवश्यक - ए.के. श्रीवास्तव
ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. ए.के. श्रीवास्तव यांनी मृदा शास्त्र यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ज्याप्रकारे मानवाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. त्याचप्रकारे पिकांसाठी सुद्धा मातीची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मृदा शस्त्र समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी प्रयोगशाळेत शेतातील मातीची परीक्षण करू शकतात. यासाठी शासनाने मृदा आरोेग्य कार्ड तयार केले आहे. खास नागपुरी संत्र्यासाठी हे मृदा आरोग्य कार्ड असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
इंडो-इस्रायल संत्रा प्रकल्प - डी.एम. पंचभाई
कृषी महाविद्यालयाचे असोसिएट अधिष्ठाता डॉ. डी.एम. पंचभाई यांनी भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त संत्रा प्रकल्प असलेल्या हाय डेन्सिटी प्लॅन्टिंगबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, इस्रायल हा प्रतिकूल परिस्थितीत संत्र्याचे उत्पादन कसे वाढवतो, ते शिकण्यासारखे आहे. त्या धर्तीवर येथे एक प्रकल्प साकारण्यात आला, त्याची माहिती त्यांनी दिली.
रोपाची काळजी नर्सरीपासूनच व्हावी- ए.के. दास
ज्येष्ठ शास्त्रज्ञ ए.के. दास यांनी लिंबूवर्गीय झाडावरील रोगाबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, झाडांना रोगाची भीती असते. आपल्याकडे संत्र्याला डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची मोठी भीती असते. झाडाला रोग होऊ नये म्हणून नर्सरीत रोप तयार होत असल्यापासूनच त्याची काळजी घेण्याची गरज आहे. नर्सरीमध्येच रोपाला रोग असेल तर झाडावर रोग होईलच. त्यानंतर संत्रा लागवडीपासून काळजी घेण्याची गरज आहे.
संत्र्यांचे सुरक्षित पॅकिंग महत्त्वाचे - दिनेश कुमार
कृषिशास्त्रज्ञ डॉ. दिनेश कुमार यांनी संत्रा उत्पादकांनी संत्र्याला बाजारात योग्य भाव मिळावा यासाठी त्याच्या सुरक्षित पॅकेजिंगवर अधिक लक्ष देणे महत्त्वाचे आहे. पॅकिंग चांगले असेल तर त्याची ब्रॅन्डींगही करता येते. पॅकिंगवर आपल्या संत्र्यांचे ब्रॅन्डींग करताना मराठी भाषेचा वापर करावा, उदाहरणार्थ नागपुरी संत्रे हे मराठीत लिहिले असेल तर विदेशात त्याला मागणी वाढते. कारण स्थानिक भाषेत असेल तर ते खरे समजले जाते. तेव्हा यादिशेनेही काळजी घ्यावी.
पाणी व्यवस्थापन आवश्यक - पी.एस शिरगुरे
कृषिशास्त्रज्ञ डॉ. पी.एस. शिरगुरे यांनी पाणी व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, संत्रा रोपाला योग्य पाण्याची गरज असते. पाणी जास्तही नको आणि कमीही नको. तेव्हा पाण्याचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. यापुढे जाऊन ओल्याव्याचे व्यवस्थापनही करावे लगले, असे ते म्हणाले.
एकिकृत कीड व्यवस्थापन व्हावे - अजिंता जॉर्ज
शस्त्रज्ञ डॉ. अंजिता जॉर्ज यांनी एकीकृत कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, किडे हे चार प्रकारचे असतात. रस शोषून घेणारे, पाने खाणाऱ्या, फळ खाणारे आणि फूल खाणारे असे त्यांचे प्रकार आहेत. त्यादृष्टीने संत्रा झाडांचे व्यवस्थापन होणे आवश्यक असते. यासाठी झाडे जवळजवळ लावण्यात येऊ नयेत. एकमेकांशी जुळलेल्या फांद्या छाटाव्यात. शेतकरी स्वत: याचे नियंत्रण करू शकतात. यासाठी कृषितज्ञांची मदत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी डॉ. डी.के. घोष यांनी झाडांवरील रोग, डॉ. एन. विजयाकुमारी यांनी टिशू कल्चर, डॉ. आय.पी. सिंंग यांनी हायटेक नर्सिंग मॅनेजमेंट आणि डॉ. ए.के. सोनकर यांनी रूट स्टॉक्स या विषयावर मार्गदर्शन केले.