ठाकरे महाराज पंढरपूरला यावेत, ही जणू विठ्ठलाचीच इच्छा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 10:24 AM2021-07-20T10:24:12+5:302021-07-20T10:25:03+5:30

Nagpur News परंपरेप्रमाणे दरवर्षी देवशयनी एकादशीच्या पंधरा दिवस आधी वेगवेगळ्या ठिकाणच्या पालखी आळंदी येथे पोहोचतात आणि दुसऱ्या दिवशी तेथून पंढरपुराकडे पायी वारी सुरू होते. यंदा २ जुलै रोजी वारकऱ्यांची पालखी आळंदीला पोहोचली आणि ३ जुलै रोजी तेथून आळंदीकडे पायी वारी रवाना झाली.

Let Thackeray Maharaj come to Pandharpur, this is like Vitthal's wish! | ठाकरे महाराज पंढरपूरला यावेत, ही जणू विठ्ठलाचीच इच्छा!

ठाकरे महाराज पंढरपूरला यावेत, ही जणू विठ्ठलाचीच इच्छा!

googlenewsNext
ठळक मुद्देसंचारबंदीचे अनेक अडथळे पार करीत नागपूरची दिंडी पांडुरंगाच्या भेटीला


प्रवीण खापरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भक्ताच्या भावनेपुढे देवही हतबल असतो आणि त्याला जो हवा त्याला तो बोलावतोच. किंबहुना, त्याला साक्षात्कार देण्यासाठी अडथळे पार करण्याची प्रेरणा व सामर्थ्यही देतो. देव भक्ताचा भुकेला असतो, हे उदाहरण द्यायचे झाले तर नागपूरचे फेटरी येथील ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे यांचे द्यावे लागेल. वर्तमानातील परिस्थितीनुरूप आलेले अनेक अडथळे पार करीत ठाकरे महाराज पंढरपुरात दाखल झाले आहेत. जणू ठाकरे महाराज पंढरपुरी यावेत ही विठ्ठलाचीची इच्छा होय.

परंपरेप्रमाणे दरवर्षी देवशयनी एकादशीच्या पंधरा दिवस आधी वेगवेगळ्या ठिकाणच्या पालखी आळंदी येथे पोहोचतात आणि दुसऱ्या दिवशी तेथून पंढरपुराकडे पायी वारी सुरू होते. यंदा २ जुलै रोजी वारकऱ्यांची पालखी आळंदीला पोहोचली आणि ३ जुलै रोजी तेथून आळंदीकडे पायी वारी रवाना झाली. त्यात विश्व वारकरी सेवा संस्थान, नागपूरच्या वतीने ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे यांच्या नेतृत्वात विदर्भातील पालखी, दिंडींचा सहभाग होता.

मात्र, १६ जुलैपासून पंढरपुरात संचारबंदीची घोषणा झाली आणि वारीला पोलिसी अटकाव झाला. वारीचे नेतृत्व करणारे बंडातात्या कराडकर यांना अटक झाली आणि त्यांना त्यांच्या गृहनगरी साताऱ्याला पाठविण्यात आले. यंदा विठ्ठलाच्या चरणाचे दर्शन होणार नाही म्हणून अनेकांनी परतीचा निर्णय घेतला. मात्र, ठाकरे महाराज मागे वळण्यास तयार नव्हते. अडथळे मोठे की भक्ती मोठी, हाच त्यांचा भाव होता. एकटेच ते काही मोजक्या वारकऱ्यांसोबत बसने वाकरीपर्यंत पोहोचले आहेत.

त्यानंतर शासनाने केवळ दहा मानाच्या पालखींनाच पंढरपुरात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला आणि अखेरपर्यंत तग धरून ठेवलेल्या भक्तांच्या भक्तीला यश आले. मानाच्या प्रत्येक पालखी-दिंडीत केवळ ४० वारकरी असे एकूण ४०० वारकरी देवशयनी एकादशीला पंढरपुरात प्रवेश करीत आहेत आणि त्यात भरतवाडा, काटोल येथील सद्गुरू जोध महाराज दिंडीचे ते एकट्यानेच नेतृत्व करीत आहेत. १६-१७ दिवसांतील विठ्ठल भेटीचा हा त्यांचा प्रवास ग.दी. माडगूळकरांच्या ‘परब्रह्म हे भक्तासाठी, उभे ठाकले भीमेकाठी, उभा राहिला भाव सावयव, जणु कि पुंडलिकाचा’ या ओळींचा साक्षात्कार देतो.

हा प्रवासच माझ्या विठ्ठलाचा साक्षात्कार

पंढरपुरीची वारी म्हणजे केवळ विठ्ठलाच्या चरणाचे दर्शन नव्हे, तर येथे जमणाऱ्या वारकऱ्यांच्या तना-मनात वास करणाऱ्या पांडुरंगाच्या दर्शनाचा सोहळा असतो. वृद्धही तरुण होतो, आंधळाही डोळस होतो... याची साक्षात प्रचीती या वारीत असते. यंदा तो सोहळा नाही; पण देहभान विसरण्याचा भाव कुणाचाच कमी झालेला नाही. निर्बंधांचे अनेक अडथळे पार करीत पंढरपुरात पोहोचणारा प्रत्येक वारकरी हा विठ्ठलाचा साक्षात्कारच आहे.

- ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे

आमच्या निमंत्रणाला मान मिळाला

पंढरपुरातील संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी सोहळ्याचा मानकरी म्हणून इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या पालखी-दिंडीला निमंत्रण देण्याची आमची परंपरा आहे. नामदेव महाराजांचे वंशज ही परंपरा आजही पाळत आहेत. इतके अडथळे पार करीत ठाकरे महाराज आणि इतर पंढरपूरला आले, ही आमचा मान वाढविणारी घटना आहे.

- ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के, मानकरी

Web Title: Let Thackeray Maharaj come to Pandharpur, this is like Vitthal's wish!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.