अतिक्रमण कारवाईत लाठीमार
By admin | Published: February 5, 2016 02:40 AM2016-02-05T02:40:01+5:302016-02-05T02:40:01+5:30
शहरातील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाचे प्रकार वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी महापालिका व नासुप्रच्या पथकाकडून कारवाई केली जाते.
जरीपटका भागात तणाव : व्यापाऱ्यांकडून विरोध
नागपूर : शहरातील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाचे प्रकार वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी महापालिका व नासुप्रच्या पथकाकडून कारवाई केली जाते. परंतु जरीपटका व खामला येथे कारवाई करताना पथकाला विरोधाला सामोरे जावे लागले. जरीपटका येथील बाजारभागात महापालिकेच्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला गुरुवारी व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यामुळे काहीवेळ या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच खामला येथे बुधवारी एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास जरीपटका, पाचपावली व मानकापूर पोलीस स्टेशनचा प्रचंड पोलीस बंदोबस्त, सोबतच राखीव पोलीस दलाच्या जवानांसह जरीपटका येथे पोहचले. मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्या नेतृत्वात कारवाईला सुरुवात करण्यात आली. परंतु फुटपाथवर केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करताच व्यापाऱ्यांनी याला विरोध दर्शविला. माजी नगरसेवकांनी या कारवाईला विरोध दर्शविला. सोबतच व्यापारी व नागरिक विरोध करू लागले. यामुळे येथे मोठा जमाव झाला होता. परंतु प्रचंड पोलिस बंदोबस्त असल्याने त्यांचा विरोध मावळला. अतिक्रमण करणाऱ्या १५ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. दरम्यान महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून अतिक्रमण काढण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली. पुढील कारवाई स्थगित करण्यात आली. त्यानंतर दयानंद पार्क येथील अतिक्रमण हटविण्यात आले. ही कारवाई अभियंता एस.वी. बागडे, भास्कर माळवे, मंजू शाह, जमशेट अली, शरद इरपाते, वानखेडे आदींच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)