शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू व्हावा

By admin | Published: December 30, 2016 02:38 AM2016-12-30T02:38:39+5:302016-12-30T02:38:39+5:30

आपण शेतकऱ्यांविषयी खूप बोलतो, चर्चा करतो. मात्र खरंच आपल्याला शेतकरी कळला का? त्याच्यासोबत आपण कधीतरी संवाद साधतो का?

Let's be the center for development of farmers | शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू व्हावा

शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू व्हावा

Next

चर्चासत्र : शोभाताई फडणवीस यांचे प्रतिपादन
नागपूर : आपण शेतकऱ्यांविषयी खूप बोलतो, चर्चा करतो. मात्र खरंच आपल्याला शेतकरी कळला का? त्याच्यासोबत आपण कधीतरी संवाद साधतो का? त्याला सन्मान देतो का? याचा विचार करण्याची गरज आहे. दरवर्षी बजेटमध्ये कृषीसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाते, परंतु ती कधीच खर्च होत नाही. शासनाच्या विविध योजना आहेत, मात्र त्याही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्याला विकासाचा केंद्रबिंदू मानल्या जात नाही, तोपर्यंत शेतकरी हा सुखी होणार नाही, असे प्रतिपादन राज्याच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केले.
भारताचे पहिले कृषिमंत्री तथा शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११८ व्या जयंती सप्ताहनिमित्त कृषी महाविद्यालय, नागपूर, अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजि. मित्र परिवारातर्फे ‘आगामी अंदाजपत्रकात कृषी, ग्रामीण व्यवस्था व कृषीवर आधारित उद्योगाकरिता तरतूद’ या विषयावर गुरुवारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर, आयडीबीआय बँकेचे माजी संचालक अर्जुन घुगल, नारायण होले पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एन. डी. पार्लावार व संजय वाघमारे उपस्थित होते. फडणवीस पुढे म्हणाल्या, निसर्गाने विदर्भाला खूप काही दिले आहे. येथे वर्धा, वैनगंगा व पैनगंगा सारख्या मोठमोठ्या नद्या आहेत. मात्र असे असताना येथील केवळ १३ टक्केच क्षेत्र ओलिताखाली आहे. शिवाय उर्वरित ८७ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. विदर्भातील नद्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे येथे धरणे आणि तलाव बांधणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र ‘जलयुक्त शिवार’ च्या माध्यमातून आता तो प्रयोग सुरू झाला आहे. त्याचा परिणामही दिसू लागला आहे. पाण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे.
याशिवाय शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि माफक दरात खते उपलब्ध झाले पाहिजे. असेही त्या म्हणाल्या. आज स्पर्धेच्या युगात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, अशीही त्यांनी यावेळी मागणी केली. कार्यक्रमाला शरद चांडक, प्रणय पराते, दिलीप मोहितकर व अजय तायवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद राऊत यांनी केले. प्रणय पराते यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

डॉ. पंजाबराव देशमुख स्मारकाला ‘दमनी’ भेट
अ‍ॅग्रोव्हेट संस्थेतर्फे महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मारकाला एक ‘दमनी’ भेट देण्यात आली आहे. या ‘दमनी’चे गुरुवारी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर, एन. डी. पार्लावार, प्रणय पराते, दिलीप मोहितकर, अजय तायवाडे, नारायण होले पाटील व व्ही. एस. टेकाडे उपस्थित होते. ती ‘दमनी’ मध्य प्रदेशातील बालाघाट येथून आणण्यात आली असून, ती ८० वर्षे जुनी आहे. त्या आकर्षण ‘दमनी’ला डॉ. पंजाबराव देशमुख स्मारकाशेजारी ठेवण्यात आले
आहे.

 

Web Title: Let's be the center for development of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.