चला साजरे करू या ‘इको बाप्पा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 07:00 AM2020-08-11T07:00:00+5:302020-08-11T07:00:12+5:30
यंदाच्या श्रीगणेशोत्सवाला ‘इको फ्रेण्डली’ स्पर्श देण्याचा प्रयत्न पर्यावरणवादी संस्था, संघटना करत आहेत आणि त्याच हेतूने गर्दीत जाणे टाळणे, संसर्गाचा धोका परतविण्यासाठी ‘इको बाप्पा’ची संकल्पना पुढे येऊ लागली आहे.
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यावरणाचा समतोल, संसर्गाचा धोका आणि बरेच संकट ओढवल्याच्या काळात सर्व विघ्न दूर करणाऱ्या बाप्पाचा उत्सवही निर्विघ्न पार पडावा, अशी मनोमन भावना भक्तांची आहे. काळच असा आला आहे की उत्सवाचा जल्लोष करता येणार नाही. मात्र, त्यामुळे भक्तांचा उत्साह कमी होईल असेही नाही. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या श्रीगणेशोत्सवाला ‘इको फ्रेण्डली’ स्पर्श देण्याचा प्रयत्न पर्यावरणवादी संस्था, संघटना करत आहेत आणि त्याच हेतूने गर्दीत जाणे टाळणे, संसर्गाचा धोका परतविण्यासाठी ‘इको बाप्पा’ची संकल्पना पुढे येऊ लागली आहे.
गेल्या काही वर्षांपासून शेणापासून, तणसापासून ते आरोग्यदायी बीजांचे रोपण असलेल्या गणपती मूर्तीपर्यंत ही संकल्पना हळूहळू रुढ व्हायला लागली आहे. मात्र, यावर्षी कोरोनाचा संसर्ग हे सर्वात मोठे संकट आहे. अशात भक्तांनी घराबाहेर पडून, बाजारात जाऊन ‘कोरोना कॅरिअर’ बनू नये तर घरीच राहून ‘कोरोना वॉरिअर’ बनावे, असे आवाहन केले जात आहे. शिवाय, यंदा बाप्पाच्या मूर्तींचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच कोरोना रुग्ण असल्याने अनेक भाग सील करण्यात आले आहेत. तेव्हा घरच्या घरीच सोप्या पद्धतीने मूर्ती कशा बनवायच्या किंवा पर्यावरणपूरक अनुष्ठान कसे पार पाडायचे, असे आवाहन केले जात आहे.
बाप्पाच्या अनेक विधा
प्रत्येकाच्या देवघरात बाप्पा विराजमान आहेत. मात्र, श्रीगणेशोत्सवात पार्थिव अर्थात विसर्जन करावयाच्या मूर्तींचे पूजन केले जाते. अशात कोरोना सीलचा ठप्पा लागलेल्या परिसरातील नागरिकांपुढे मोठ्या समस्या आहेत. त्यामुळे भक्त घरातल्या तुळशीजवळची माती घेऊन जशी जमेल तशी मूर्ती कोरून बाप्पा बनवून अनुष्ठानासाठी वापरता येऊ शकते. कणाकणात शिवतत्त्व आहे आणि बाप्पाचा वास सर्वत्र आहे. म्हणून नाहीच बनवता आली मूर्ती तर श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना करतानाच मातीचा गोळा बनवून तोच बाप्पा म्हणून बसवता येईल. शिवाय, हळदीचा, सुपारीचा, मैद्याचा, कणकीच्या पिठाचा, डाळीचा वापर करूनही बाप्पा जसा जमेल तसा किंवा गोल गोळाच बाप्पा म्हणून स्थापित करता येऊ शकतो. भाज्या व फळांचा वापर करूनही बाप्पा बसवता येऊ शकतो.
निर्माल्याचे पावित्र्य पसरेल घरोघरी
हार, फुले, दुर्वा, बेल अशा अनेक प्रकारच्या वस्तू वाहून झाल्यावर फेकल्या जातात किंवा तलावात विसर्जित केल्या जातात. त्यापेक्षा या निर्माल्याचा उपयोग करून बागेतील झाडांसाठी नायट्रोजन व कार्बनयुक्त खत तयार करता येते. श्रीगणेशोत्सवाच्या दहा दिवसात ही सवय लागेल आणि विसर्जनानंतर घरच्या घरी खत तयार झालेले असेल.
बाप्पा खºया अर्थाने पर्यावरणाची देवता आहे. निसर्गावर आलेले विघ्न दूर करण्याची जबाबदारी आपली आहे. कोरोनाच्या काळात भक्तांनी स्वत:वरील संकट दूर करण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि गर्दी टाळण्यासाठी हे उपाय केले तर संरक्षण आपलेच होणार आहे. यासाठी अनेक संस्था युट्यूब व सोशल माध्यमांवर व्हिडिओ आणि माहिती शेअर करत आहेत. त्याचा लाभ घ्यावा.
- रोहन अरासपुरे, संस्थापक अध्यक्ष, दि ड्रीम फॉर लाईफ फाऊंडेशन