तर अंगणवाड्या बंद करू

By admin | Published: August 28, 2014 02:01 AM2014-08-28T02:01:26+5:302014-08-28T02:01:26+5:30

शासनाने लागू केलेल्या वाढीव रकमेसह पाच महिन्यांपासून थकीत असलेले मानधन सात दिवसात मिळाले नाही तर अंगणवाड्या बेमुदत बंद करू, असा इशारा अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी दिला.

Let's close the anganwadi | तर अंगणवाड्या बंद करू

तर अंगणवाड्या बंद करू

Next

सेविकांचा इशारा: मानधन थकीत
नागपूर : शासनाने लागू केलेल्या वाढीव रकमेसह पाच महिन्यांपासून थकीत असलेले मानधन सात दिवसात मिळाले नाही तर अंगणवाड्या बेमुदत बंद करू, असा इशारा अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी दिला.
राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या (आयटक) नेतृत्वात बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी मोठ्या संख्येने सेविका उपस्थित होत्या. थकित असलेले मानधन त्यातच केंद्र सरकारने प्रत्येक अंगणवाडीत आणखी एक महिला कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्तीला सेविकांचा विरोध आहे. सेविकांना नियमित मानधन न देणाऱ्या सरकारतर्फे अंगणवाडीत गरज नसताना तिसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती कशासाठी केली जाते असा सवाल त्यांनी केला. त्याऐवजी आहे त्या सेविकांचेच मानधन वाढवून त्यांच्याकडून अतिरिक्त काम करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.
दरम्यान गेल्या दिवाळीचे भाऊबीज अनुदान कामठी प्रकल्पातील सेविकांना मिळाले नाही, यासाठी अनुदान आले होते. पण अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ते वाटप होऊ शकले नाही. या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व सात दिवसाच्या आत थकीत मानधनाचे वाटप करावे, अशी मागणी संघटनेच्या सचिव जयश्री चहांदे यांनी केली. अन्यथा मासिक अहवाल पाठविणे बंद करून बेमुदत काळासाठी अंगणवाड्या बंद केल्या जातील, असा इशारा यावेळी संघटनेच्यावतीने देण्यात आला.
दुपारी संघटनेचे एक शिष्टमंडळ उपायुक्तांना भेटले व त्यांना मागण्याचे निवेदन दिले. त्यानंतर महिला बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
आंदोलनात रेखा कोहाड, वनिता कापसे, कल्पना शेवाळे, कल्पना गिरडकर, शारदा गडेकर, मंगला रंगारी,शैला काकडे, आशा शेंडे, विद्या गजभिये, स्वाती उके, वर्षा मानकर, मंगला चामट, सुनीता मानकर, उषा सहारे, कल्पना चाफले, जास्वंदा खोब्रागडे, लक्ष्मी वाढिवे, ज्योती अंडरसहारे,अनिता मेश्राम, प्रिती बोरकर यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.(प्रतिनिधी)

Web Title: Let's close the anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.