संविधान बदलण्यासाठी सरसावणारे हात कलम करू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 06:47 PM2018-07-17T18:47:46+5:302018-07-17T18:52:10+5:30
मनुवादी विचार देशात डोके वर काढू पाहत आहे. संविधानापेक्षा मनुस्मृती यांना श्रेष्ठ वाटू लागली आहे. भाजपा संविधानाला नख लावू पाहत आहे.मात्र, रक्त सांडले तरी संविधान बचावासाठी आम्ही लढाई लढू. संविधान बदलण्यासाठी सरसावणारे हात कलम करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनुवादी विचार देशात डोके वर काढू पाहत आहे. संविधानापेक्षा मनुस्मृती यांना श्रेष्ठ वाटू लागली आहे. भाजपा संविधानाला नख लावू पाहत आहे.मात्र, रक्त सांडले तरी संविधान बचावासाठी आम्ही लढाई लढू. संविधान बदलण्यासाठी सरसावणारे हात कलम करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपुरातील देशपांडे सभागृहात ‘संविधान बचाव, देश बचाव मेळावा’ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी पेटती मशाल उंचावून संविधान रक्षणाची शपथ घेण्यात आली. मेळाव्याला माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, रमेश बंग, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रकाश गजभिये, पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, आ. विद्या चव्हाण, आ.सुमन पाटील, आ. ज्योति कलानी, आ. संध्या कुपेकर, आ. दिपीका चव्हाण, माजी आमदार उषा दराडे, शहर अध्यक्ष अलका कांबळे यांच्यासह विदर्भातील सर्व महिला जिल्हाध्यक्ष उपस्थित होत्या. या वेळी अजित पवार म्हणाले, संतांपेक्षा मनु श्रेष्ठ आहे, असे सांगण्याचे धाडस संभाजी भिडे करतातच कसे. त्यांच्या मागचा मास्टर मार्इंड कोण आहे, असा सवाल करीत कुठल्या दिशेने कारभार सुरू आहे, याचा जाब त्यांनी सरकारला विचारला. कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणूक लागू शकते, असे सांगत भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.
जयंत पाटील म्हणाले, भाजपाचे केंद्रीय मंत्री संविधान बदलण्यासाठी आम्ही सत्तेत आल्याचे सांगतात. सरसंघचालक मोहन भागवत आरक्षणाच्या फेरविचारासाठी समिती नेमण्याची शिफारस करतात. भाजपा संविधानाला धक्का पोहचवू पाहत असल्याचे सांगत भाजपचे मनसुबे उधळून लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
तुमची नियत साफ नाही : भूजबळ
मेळाव्यात भूजभळ यांचे फुले पगडी घालून स्वागत करण्यात आले. या वेळी भूजबळ म्हणाले, मनुवादी कायदा हीन होता. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. पण आज पुन्हा मनुवादी कार्यक्रम सुरु झाले आहेत. लोकशाहिचे चक्र उलटे फिरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विरोधात बोलणाऱ्यांना गोळ्या घातल्या जात आहे. हे खडा फेकून बघतात, पचला तर पुढे जातात. अंधाराने भरलेली मनुस्मृती नकोच असे सांगत संविधानामुळे लोकशाही जिवंत राहिली. देशात वाढलेला हिंसाचार, जातीवाद व मुस्कटदाबी वाढल्यामुळे संविधान बचाव म्हणण्याची वेळ आली आहे. संविधान विरोधी पावले अडविण्यासाठी लोकशाही मागार्ने रस्त्यावर यावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. गोरक्षेच्या नावावर माणसे मारता तुम्ही, चांगले कपडे घातले म्हणून दलितांना मारता तुम्ही. अशांवर कारवाई होत नाही. शालेय पुस्तकांच्या ठिकाणी धार्मिक पुस्तके वाटली जात आहेत. तुमची नियत साफ नाही. मुहं मे राम बगल मे छुरी सुरु आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
ईव्हीएम व मनस्मृतीची होळी
मेळाव्यानंतर नेत्यांच्या हस्ते ईव्हीएम व मनस्मृतीची होळी करण्यात आली. या वेळी संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबादचे नारे देण्यात आले.
असे झालेत ठराव ; मेळाव्यात एकूण पाच ठराव एकमताने संमत करण्यात आले
- संविधान बचाव कार्यक्रम ग्रामस्तरापर्यंत राबविला जाईल.
- राज्य महिला आयोगास वाढीव अधिकार देऊन प्रत्येक जिल्ह्यात आयोगाचे केंद्र स्थापन करावे.
- लोकसभेत ३३ टक्के महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करावे.
- सातबाराच्या उताऱ्याच्या मागच्या बाजुला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा फोटो छापावा.
- शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे.