एक पोळी कमी खाऊ, सलादचा समावेश जेवणात करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 10:18 AM2021-06-16T10:18:23+5:302021-06-16T10:23:41+5:30

Nagpur News घरोघरी स्वयंपाकघरातील मेनू बदलल्याचे दिसून येते. जेवणात एक पोळी आणि भात कमी असला तरी चालेल. मात्र, मोड उगवलेली कडधान्ये, डाळीची चटणी, टोमॅटो - गाजर - कच्च्या भाज्या-बिट आदींचे सलाद जेवणात अगत्याचे झाले आहे.

Let's eat less bread, let's include salad in the meal | एक पोळी कमी खाऊ, सलादचा समावेश जेवणात करू

एक पोळी कमी खाऊ, सलादचा समावेश जेवणात करू

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाने बदलले स्वयंपाकघरातील मेनूआरोग्यदायी व्यंजनांवर गृहिणींचा भर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे आरोग्य काय नि आरोग्य व्यवस्था काय, या सगळ्यांचे तीनतेरा वाजल्याचे पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्वांनीच अनुभवले आहे. मी सुदृढ आहे, मला काहीच होणार नाही, माझे डाएट उत्तम आहे, मी वेळच्या वेळी मेडिकल चेकअप करतो, अतिरिक्त प्रोटिन्स घेत असतो... अशा बाता हाकणाऱ्यांचे पितळ संक्रमणाने उघडे पाडले. भारतीय खानपानामुळे भारतीयांची इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते, अशा फुशारक्याही मारण्यात येत होत्या. मात्र, सद्यस्थितीत ही खानपान परंपरा हयात आहे का, हा प्रश्न आहे. पारंपरिक खानपानाची जागा कधीच चटकपटक स्ट्रिट फूड किंवा घराघरात पोहोचलेल्या जंकफूडने घेतली आहे, याचा अनेकांना विसर पडला आहे. पडलेला हाच विसर संक्रमण काळात आरोग्याला नडला आणि नंतरची वस्तुस्थिती सर्वांपुढे आहे. लोक आता आरोग्याबाबत सजग होत असल्याचे दिसून येत आहे आणि ही सजगता खानपानादी पारंपरिक पथ्यातूनच पाळली जाऊ शकते, असा विश्वासही भारतीय आहारशास्त्राने निर्माण केला आहे. त्याचा सुपरिणाम म्हणा घरोघरी स्वयंपाकघरातील मेनू बदलल्याचे दिसून येते. त्या विशेषत्त्वाने सलाद महत्त्वाचे झाले आहे. जेवणात एक पोळी आणि भात कमी असला तरी चालेल. मात्र, मोड उगवलेली कडधान्ये, डाळीची चटणी, टोमॅटो - गाजर - कच्च्या भाज्या-बिट आदींचे सलाद जेवणात अगत्याचे झाले आहे.

जेवणाच्या आणि फळभाज्यांच्या वेळा होत आहेत निश्चित

‘उत्तम आहार, उत्तम आरोग्य’ या म्हणीप्रमाणे घरातील गृहिणींनी घरातील सदस्यांना विशेषत: जे कोरोना संक्रमणातून नुकतेच परतले, त्यांना आहार, विहार आणि समयाचे पालन करण्याची तंबी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिलेली दिसून येते. विशेषत: आहारशास्त्राचे पालन करण्याचे प्रयत्न यातून दिसत आहेत. विशेषत: रात्रीचे जेवण सूर्यास्ताआधी किंवा सूर्यास्त होताच घेण्याचा आग्रह होत असल्याचे दिसून येते. विशेषत: फळ, दही आदी वस्तू सूर्यास्तानंतर न घेणे, दूध हळदीसह रात्री पिणे, रात्री झोपताना व सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणे, रात्रीला घरगुती मसाल्यांद्वारे तयार करण्यात येत असलेला काढा घेणे, ही आता परंपरा होत असल्याचे दिसून येते.

जंगली भाज्यांची मागणी

पावसाळ्याचा शुभारंभ होताच नागपुरात शेजारी गावांतून किंवा जंगल परिसरातून रानभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यात शेरडिरे, हरदफरी, जंगली मशरूम, बांबूचे वास्ते (मूळ / कोंब), कुरकुरीची भाजी आदींचा समावेश असतो. या भाज्यांची मागणी जाणकारांकडून होत असते. याच जाणकारांच्या माध्यमातून शहरातील लोक आता अत्याधिक प्रोटीन व औषधीय तत्त्व असलेल्या या भाज्या मागवत आहेत आणि जेवणात घरातील सदस्यांना आवर्जुन वाढत असल्याचे दिसते.

कच्च्या भाज्या आणि कडधान्ये

मेथी, चवळी, पालक आदी हिरव्या भाज्या जवळपास सगळ्यांनाच परिचयाच्या आहेत. या भाज्या जेवताना सलाद म्हणून कच्चे खाणे योग्य असल्याने त्यांची मागणी गृहिणी मोठ्या प्रमाणात करत आहेत. जेवणात या भाज्यांचा समावेश असलेले सलाद अगत्याचे झाले आहे. सोबतच मूग, चणा आदी कडधान्ये रात्रीला भिजत घातल्यावर मोड येण्यासाठी ठेवले जाते. ही कडधान्ये अतिरिक्त विटॅमिन्ससाठी आता घरादारात अगत्याचे झाले आहे.

फास्ट, जंक फूड नकोच

चवीला चटपटीत आणि पचायला जड असलेल्या फास्ट व जंक फूडचे दुष्परिणाम आता सर्वांनाच ठाऊक झाले आहेत. विशेषत: कोरोना काळात ढासळलेल्या रोगप्रतिकारशक्तीने हा अनुभव सगळ्यांनाच आलेला आहे. त्यामुळे, नुडल्स, पिझ्झा, पास्ता आदी चायनीज व इटालियन फूडला नकार मिळत आहे. तसेही हे मेन्यू रेस्टेराँमधून मागवण्यावर अनेकांचा भर असतो. मात्र, सद्यस्थितीत रेस्टेराँवर असलेली बंधने आणि संक्रमणाची भीती म्हणूनही या व्यंजनांना सध्या तरी नकारच असल्याचे दिसून येते.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे मेनू हवेच

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नाष्टा व जेवणात काही मेनू महत्त्वाचे ठरवले जात आहेत. त्यानुषंगाने बीट, गाजर, काकडी, स्वीट कॉर्न, मशरूम, भिजवलेली चना डाळ, डाळीची चटणी आदींचा समावेश अगत्याने केला जात आहे. जेवणात एखादा मेनू कमी असला तरी सलाद अत्यावश्यक असल्याची भावना आता रुढ व्हायला लागली आहे. सोबतच ताज्या हिरव्या भाज्या व मोड आलेली कडधान्ये, मोसमी फळे जसे जांभळं यांना मेनूमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

गृहिणी म्हणतात...

* आम्ही खेडेगावातील असल्यामुळे मोसमी भाज्यांची जाण व ओळख आहे. त्यामुळे, अत्याधिक प्रोटीन्स, औषधीय तत्त्वांसाठी आम्ही रानभाज्या खेडेगावातून सतत मागवत असतो. या भाज्यांमुळे त्या त्या मोसमातील सत्त्व व तत्त्व शरीराला मिळतात. कोरोना काळानंतर तर आहारावर अधिक लक्ष देत आहोत.

- मीनाक्षी लेदे, गृहिणी

 

* कोरोना काळापासून रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या हिरव्या भाज्यांवर अधिक लक्ष्य केंद्रित झाले आहे. सोबतच जेवणाच्या वेळा निश्चित केल्या असून, शरीराला उसंत मिळावी, असा आहार कुटुंबीयांना देण्यावर भर देत आहे.

- शरयु श्रीरंग, गृहिणी

* मोड आलेली कडधान्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. या काळात या खाद्यवस्तू अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे, कडधान्यासोबतच कोणती व्यंजने कधी घ्यावी आणि कधी टाळावी, याचा विशेष असा आलेख तयार केलेला आहे.

- कांता येरपुडे, गृहिणी

.................

Web Title: Let's eat less bread, let's include salad in the meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न