'सामना होऊ तर द्या, आत्ता टॉस झालाय'...; विदर्भ शिवसेनेत ‘ऑल इज वेल’ असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 07:32 PM2022-02-14T19:32:42+5:302022-02-14T19:33:45+5:30
Nagpur News शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात राहतील, असा दावा केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर ‘सामना होऊ द्या, आत्ता तर टॉस झाला आहे’, असे वक्तव्य केले आहे.
नागपूर : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रपरिषद घेण्याची घोषणा केली असून, त्यानंतर भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात राहतील, असा दावा केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर ‘सामना होऊ द्या, आत्ता तर टॉस झाला आहे’, असे सूचक वक्तव्य करत भाजप-सेनेचा संघर्ष आणखी तीव्र होईल, असे संकेतच दिले आहे. नागपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
विदर्भात शिवसेना नेत्यांमध्ये एकी नसल्याचे याअगोदर अनेकदा दिसून आले आहे. नागपुरातदेखील अनेक जुन्या शिवसैनिकांमध्ये खदखद आहे. विशेषतः नवीन कार्यकारिणी घोषित झाल्यापासून सेनेत अंतर्गत वाद वाढला आहे. परंतु आदित्य ठाकरे यांनी मात्र पक्षात सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेत कुठलीही अंतर्गत नाराजी नाही. यासंबंधात प्रसारमाध्यमांकडूनच दावे-प्रतिदावे केले जातात. प्रत्यक्ष चित्र असे नाही, असे ठाकरे म्हणाले.
पर्यावरण वाचवून विकास व्हावा
राज्य शासन विकासाच्या विरोधात नाही. जर एखाद्या प्रकल्पात पर्यावरणाशी निगडीत अडथळा येत असेल, तर मूळ आराखड्यात बदल करण्यावर भर असला पाहिजे. विशेषतः जेथे असे शक्य आहे, तेथे तर असे पाऊल उचललेच पाहिजे. अजनीत आयएमएस प्रकल्प कोणालाच नको, असे नाही. पर्यावरण वाचवून विकास झाला पाहिजे. अजनीवनाच्याबाबतीत वादाची भूमिका न घेता सामंजस्याने मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे ठाकरे म्हणाले.