चला करू या विज्ञानाशी मैत्री : अपूर्व विज्ञान मेळाव्याने झाले सहज सोपे विज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:17 AM2018-11-30T00:17:48+5:302018-11-30T00:26:12+5:30
ना प्रयोगशाळा, ना प्रयोगशाळेतील भारीभारी उपकरणे तरी गेल्या २० वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळा रंजक विज्ञानाची संकल्पना मांडत आला आहे. महाराष्ट्र शासनाने नागपूर मनपाद्वारे आयोजित या अपूर्व विज्ञान मेळाव्याची संकल्पना राज्यभरात अंमलबजावणीस आणली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ना प्रयोगशाळा, ना प्रयोगशाळेतील भारीभारी उपकरणे तरी गेल्या २० वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळा रंजक विज्ञानाची संकल्पना मांडत आला आहे. महाराष्ट्र शासनाने नागपूर मनपाद्वारे आयोजित या अपूर्व विज्ञान मेळाव्याची संकल्पना राज्यभरात अंमलबजावणीस आणली आहे.
रिफिल, प्लास्टिकच्या बॉटल, सेल, तांब्याची तार, कंचे, चेंडू, ट्रांझिस्टरचे चुंबक, फुगा, आगपेटी, दगड, माती या साहित्यापासून विज्ञानाचे मूलभूत सिद्धांत अपूर्व विज्ञान मेळाव्यातून सहज सोप्या पद्धतीने मांडले आहेत. विज्ञानाच्या बाबतीत येणारे का? आणि कसे? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराची प्रचिती या मेळाव्यातून येते. उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या परिसरात ‘चला करू या विज्ञानाशी मैत्री’ या संकल्पनेतून विज्ञानाची डोकेदुखी सहज सोपी झालेली दिसते आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रयोग महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारले आहे. या प्रदर्शनासाठी दीप्ती बिस्ट, ज्योती मेडपिलवार, पुष्पलता गावंडे, नीलिमा अढाऊ, मनीषा मोगलेवार, वंदना चव्हाण, सुनीता झरबडे, नीता गडेकर मनपाच्या या शिक्षिकांचे सहकार्य लाभले आहे.
सूर्य चंद्र एका आकाराचे का दिसतात
पृथ्वीवरून सूर्य आणि चंद्र एकाच आकाराचे का दिसतात, हे दाखविण्यासाठी अमरेश कुशवाह या विद्यार्थ्याने तीन चेंडू एक हार्डबोर्डचा वापर केला आहे. यातून अतिशय रंजक पद्धतीने सूर्य चंद्र आणि पृथ्वीतील अंतर दाखविले आहे.
खिळ्यांची ‘कम्फरटेबल’ चेअर
नेहा पुरी या विद्यार्थिनीने मेळाव्यात ठेवलेली ‘खिळ्यांची’ कम्फरटेबल चेअर’ बघून आश्चर्य वाटण्यासारखेच आहे. खिळा रुतल्यावर त्याची वेदना तुम्ही अनुभवली असेल. अशावेळी शेकडो खिळ्यांवर बसल्यावर काय अवस्था होईल? खुर्ची बघितल्यावर नक्कीच भीती वाटते. पण एकदा त्यावर बसल्यावर खरंच आरामदायक वाटते.
खुर्चीवरून उठणे इतके सोपे नाही
सिद्धी विश्वकर्मा हिने तर साध्या खुर्चीवरून शरीराच्या गुरुत्वकर्षणाचा सिद्धांत मांडला आहे. तिने दावा केला आहे खुर्चीवरून सहज उठून तर दाखवा. बघितल्यावर सर्वांना आश्चर्य वाटते, पण बसल्यावर उठताना सर्वांची दमछाक होते.
तांब्याची तार आणि चुंबकातून वीज
सुहानी मावकर ह्या विद्यार्थिनीने रिकाम्या सेलोटेपला तांब्याची तार गुंडाळली. त्याला चक्रीच्या आकाराचे चुंबक लावले. चुंबकाच्या तारांना एक छोटा एलएडी लाईट जोडला. चुंबक फिरविले की लाईट लागलो. अगदी खेळाच्या साहित्यासारखा तिचा हा प्रयोग ‘मॅग्नेट पॉवर’ चा सिद्धांत मांडतो.
कागदाचा खांब किती मजबूत
आसिया परविन या विद्यार्थिनीने ‘प्रेशर फोर्स डिस्ट्रिब्युशन’ हा सिद्धांत मांडताना कागदी खांबावर ४० किलोचे वजन सहज पेलता येते हे दाखवून दिले.
बेरीज-वजाबाकी सहज करा
डॉ. राम मनोहर लोहिया विद्यालयाच्या शिवानी आणि दीपिका यांनी तयार केलेल्या स्केलवर बेरीज-वजाबाकी झटपट सोडविता येते. तेही खेळाच्या माध्यमातून.
पाढे तयार करण्याची सोपी पद्धत
आकाश कुऱ्हाडे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या टेक्निकद्वारे ११ पासून १०० पर्यंतच्या कुठल्याही संख्येचा पाढा सहज तयार करता येतो.
छोट्या बरणीत मोठा फुगा बसतोच कसा?
छोट्याशा बरणीत पाण्याने भरलेला मोठा फुगा जातो कसा? हवेच्या दाबाचा सिद्धांत माडणारा हा प्रयोग विद्यार्थ्यांनी अतिशय रंजकतेने प्रदर्शनात मांडला आहे.
कोन से कान मे आवाज आयी
आफरीन बानू विद्यार्थिनीने ‘कोन से कान में आवाज आयी’ शीर्षकावर तयार केलेला प्रयोग बघणाऱ्यांचे चांगलेच मनोरंजन करतो आहे. या प्रयोगातून ध्वनीचा सिद्धांत तिने मांडला आहे.
पाण्यात मेणबत्ती जळते कशी
शेख तोहीर या विद्यार्थ्याने पाण्यात मेणबत्ती जळते कशी? हा प्रयोग अतिशय रंजक पद्धतीने मांडला आहे. पाण्यात मेणबत्ती जळताना बघितल्यावर नक्कीच आश्चर्य वाटते.