चलो महाकुंभ, प्रयागराजला जायचं का? ‘आस्थेच्या जत्रेत’ पोहोचण्यासाठी भाविकांची लगबग
By नरेश डोंगरे | Updated: January 13, 2025 18:33 IST2025-01-13T18:31:15+5:302025-01-13T18:33:22+5:30
विमान आणि रेल्वेसेवाही उपलब्ध : आज पहिल्याच दिवशी १७ ट्रॅव्हल्स

Let's go to Mahakumbh, Prayagraj? Devotees rush to reach the 'Aastha Jatra'
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी भाविकांची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे ट्रॅव्हल्स, ट्रेन आणि विमान कंपन्यांनीही भाविकांना 'आस्थेच्या यात्रेत' पोहोचविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपुरातून थेट कुंभमेळ्यात अर्थात प्रयागराजला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स, ट्रेन अन् विमानसेवाही उपलब्ध आहे.
अध्यात्मिक वारसा अन् भारतीय संस्कृतीचे अनोखे पर्व ठरू पाहणारा कुंभमेळा दर १२ वर्षांनी एकदा भरतो. सोमवारी १३ जानेवारीपासून त्याला प्रयागराजमध्ये प्रारंभ झाला असून, पुढे २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात सहभागी होण्यासाठी कोट्यवधी भाविकांची धडपड सुरू आहे. ते ध्यानात घेऊन दळवळण कंपन्यांनीही वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. नागपुरातील ट्रॅव्हल्स कंपन्यांनी 'चलो प्रयागराज'ची हाक दिली आहे. मकर संक्रांतीच्या पर्वावर १४ जानेवारीपासून कुंभमेळ्यासाठी खासगी बससेवा उपलब्ध आहे. मंगळवारी एकूण १७ बस प्रयागराजकडे मार्गस्थ होणार आहेत. दुपारी ३ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांहून सुटणाऱ्या ट्रॅव्हल्सचे दरही वेगवेगळे आहेत. १५०० रुपयांपासून ३ हजारांपर्यंत एसी, नॉन एसी बसचे तिकीट भाडे आहे.
आज तीन विमानांची भरारी
१४ जानेवारीला इंडिगोची तीन विमाने नागपूर ते प्रयागराज अशी भरारी घेणार आहेत. बस आणि रेल्वेच्या तुलनेत अधिक आरामदायक आणि जलद गतीने विमानाचा प्रवास होत असला तरी त्याचे तिकीट दरही महागडे आहे. १४ जानेवारीच्या विमानाचे आज सोमवार दुपारपर्यंत प्रवासभाडे १५ ते १६ हजारांच्या घरात होते. जसजशी मागणी वाढेल तसतसे दरही वाढू शकतात.
नागपूरहून दररोज ७ रेल्वे
२२६१३ अयोध्या-रामेश्वरम एक्स्प्रेस
१२२९५ संघमित्रा एक्स्प्रेस
१२६६९ गंगाकावेरी एक्स्प्रेस
२२३५२ पाटलीपुत्र एक्स्प्रेस
१२७९१ दानापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस
२२६८३ लखनऊ सुपरफास्ट एक्स्प्रेस
०६५०९ हमसफर एक्स्प्रेस
तिकीट दर
ट्रॅव्हल्स : १५०० रुपयांपासून तो ३ हजारांपर्यंत
ट्रेन : ४८० रुपयांपासून पुढे
फ्लाइट : १५ हजारांच्या पुढे
अंतर आणि प्रवास अवधी
ट्रॅव्हल्स : ६५० किलोमीटर, १२ ते १४ तासांचा प्रवास
ट्रेन : ९०० किलोमीटर, १४ ते १६ तास
फ्लाइट : ५, ७ आणि ९ तास