चला दोस्ती निभवूया, एकेक मित्र वाचवूया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 08:14 PM2020-08-01T20:14:24+5:302020-08-01T20:16:16+5:30
भेटा, नको भेटा. काही फरक पडत नाही. भेट झाली तर एकमेकांवर तुटून पडायचे अन् नाही झाली तर रुसून बसायचे. दिल, दोस्ती, दुनियादारी मैत्रीची बातच न्यारी... सर्वात पवित्र प्रेम माय-लेक/लेकीचे असते, सर्वात मोठे कर्तव्य पिता-पुत्रात असते अन् ज्ञानार्जनातील सर्वात मोठे रहस्य गुरु-शिष्यात असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जिथे काहीच नसते तिथे मैत्री असते... तर चला दोस्ती निभवूया अन् आपल्या मित्रांना संसर्गापासून वाचवूया.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भेटा, नको भेटा. काही फरक पडत नाही. भेट झाली तर एकमेकांवर तुटून पडायचे अन् नाही झाली तर रुसून बसायचे. दिल, दोस्ती, दुनियादारी मैत्रीची बातच न्यारी... सर्वात पवित्र प्रेम माय-लेक/लेकीचे असते, सर्वात मोठे कर्तव्य पिता-पुत्रात असते अन् ज्ञानार्जनातील सर्वात मोठे रहस्य गुरु-शिष्यात असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जिथे काहीच नसते तिथे मैत्री असते... तर चला दोस्ती निभवूया अन् आपल्या मित्रांना संसर्गापासून वाचवूया.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन पाळला जातो. तसे बघितल्यास मैत्रीसाठी एका दिवसाचे विशेष असे काही नाही, केवळ औपचारिकता तेवढी. तर मैत्री दिनाचे पर्व २ ऑगस्ट रोजी येतेय. अर्थातच सगळ्या मित्रांनी काही विशेष असे प्रयोजन केलेच असेल. सेलिब्रेशन हा मित्रांमधील सर्वात मोठा संसर्ग आहे आणि या संसर्गाने साऱ्या जगाला प्राचीन काळापासूनच ग्रासले आणि चैतन्य, आनंद, निरागसतेचे वारे वाहायला लागले. सध्या मात्र अवघे जग कोरोना नावाच्या सूक्ष्म दैत्याच्या चक्रात अडकले आहे. याचा संसर्ग जीव घेणारा आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे जिथे काहीच नसते तिथे मैत्री असते आणि जिथे मैत्री असते तिथे नि:स्वार्थता असते. म्हणूनच तर आनंदात एकवेळ सहभागी होणार नाही. मात्र, संकट कोसळले की सर्वात आधी हजर असतात ते मित्र. या संकटाच्या काळातही मैत्री सर्वश्रेष्ठ ठरते आहे आणि तेच कर्तव्य यंदा जपायचे आहे. प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे, हाताला मैत्रीबंध बांधणे, भेटवस्तू देणे किंवा धम्माल करणे... हे यंदा टाळूयात. कारण, हे केल्याने संसर्गाचा धोका वाढणार आहे आणि कोणतेच मित्र-मैत्रीण आपल्या मित्रांना धोक्यात घालू इच्छिणार नाही. आज प्रत्येकाजवळ एक नव्हे दोन-तीन मोबाईल फोन्स आहेत. प्रत्येकच मोबाईलमध्ये इंटरनेट आहे आणि व्हिडिओ कॉलिंग किंवा वेगवेगळ्या मिटिंग अॅप्सची सुविधाही आहे. या माध्यमांचा वापर करून एकमेकांना बंध पाठवणे, गप्पा मारणे आणि घरूनच ऑनलाईन सेलिब्रेशन करणे शक्य आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ याचप्रमाणे एकेका मित्र/मैत्रिणींनी समाज, राष्ट्राचा ढाचा तयार होतो. ज्याप्रमाणे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचे कार्य करावे लागत आहे, त्याचप्रमाणे राष्ट्राला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येक मित्र/मैत्रीण सुदृढ असणे गरजेचे आहे. म्हणून, मैत्री दिनाला गोंधळ, गोंगाट अन् गर्दी टाळूया व देशाला वाचवूया. शेवटी देशासोबतही आपले असेच एक नि:स्वार्थ असे मैत्रीचे नाते आहेच की.