स्पेशल बसमधून पाहू या संत्रानगरतील पर्यटन स्थळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 10:05 PM2021-01-04T22:05:51+5:302021-01-04T22:08:42+5:30
Special tourism bus, nagpur newsनागपूर शहराच्या आजूबाजूला असलेल्या पर्यटन स्थळांवर फिरण्यासाठी आता प्रवाशांसाठी संत्रानगरी विशेष पर्यटन बस सज्ज राहणार आहे. एसटी महामंडळाच्या वतीने १० जानेवारीपासून गणेशपेठ बसस्थानकावरून ही बस सुरू करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराच्या आजूबाजूला असलेल्या पर्यटन स्थळांवर फिरण्यासाठी आता प्रवाशांसाठी संत्रानगरी विशेष पर्यटन बस सज्ज राहणार आहे. एसटी महामंडळाच्या वतीने १० जानेवारीपासून गणेशपेठ बसस्थानकावरून ही बस सुरू करण्यात येणार आहे.
संत्रानगरी पर्यटन विशेष बस फक्त रविवारी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी चालविण्यात येईल. सकाळी ८ वाजता ही बस प्रवासासाठी निघून सायंकाळी ६ पर्यंत प्रवाशांना सेवा दिल्यानंतर गणेशपेठ स्थानकावर परत येईल. त्यामुळे आता प्रवाशांना पर्यटन स्थळांना जाण्यासाठी खासगी वाहनांची गरज भासणार नाही. नागपूर जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. येथे नागरिक सुटीच्या दिवशी फिरण्यासाठी जाणे पसंत करतात. परंतु एका दिवसात केवळ एक किंवा दोन ठिकाणी जाणे शक्य होते. यात खासगी वाहनाचे भाडेही अधिक असते. स्वत:च्या वाहनाने गेल्यास थकवा जाणवतो. परंतु आता एसटी महामंडळाच्या बसने एकाच दिवशी सहा ठिकाणी फिरण्याचा आनंद नागरिक घेऊ शकणार आहेत. ही बस गणेशपेठ बसस्थानकावरून सुरू होऊन वाडीच्या समोर सुराबर्डी येथे जाईल. येथे काही वेळ थांबल्यानंतर ही बस धापेवाडा येथे पोहोचेल. धापेवाडावरून आदासा आणि त्यानंतर खिंडसी, रामटेक आणि शेवटी ड्रॅगन पॅलेस या मार्गाने गणेशपेठला परत येईल. या बसचे प्रवासभाडे २५० रुपये आणि लहान मुलांसाठी ३० रुपये राहणार आहे.
बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी चांगली संधी
अनेकदा नागपूरच्या बाहेरून असंख्य नागरिक आपल्या नातेवाईकांकडे येतात. येथे आल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर जाण्याची त्यांची इच्छा होते. परंतु ज्या नातेवाईकांकडे ते गेले ते व्यस्त असतात. बाहेरगावावरून आल्यामुळे त्यांना वाहतूक व्यवस्था आणि पर्यटन स्थळांबाबत माहिती नसते. अशास्थितीत एसटी महामंडळाची बस त्यांच्यासाठी सोयीची ठरणार आहे. एकदा बसमध्ये बसल्यानंतर त्यांना सहा पर्यटनस्थळांचा आनंद घेता येणार आहे.