तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे...
By admin | Published: January 12, 2016 03:12 AM2016-01-12T03:12:11+5:302016-01-12T03:12:11+5:30
जगण्यातील भीषण वास्तव मांडतानाच, जगण्यावर प्रेम करायला शिकविणारे संवेदनशील कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितांनी रसिकांच्या हृदयाला हात घातला होता.
मंगेश पाडगावकर यांच्या काव्य प्रतिभेचा आदरांजली कार्यक्रम
नागपूर : जगण्यातील भीषण वास्तव मांडतानाच, जगण्यावर प्रेम करायला शिकविणारे संवेदनशील कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितांनी रसिकांच्या हृदयाला हात घातला होता. टपटप पडणाऱ्या प्राजक्ताच्या फुलांसारख्या त्यांच्या शब्दांनी अख्खे मराठी मन प्रफुल्लीत होत होते. पाडगावकरांच्या कवितेच्या रचना वर्षानुवर्षे सादर करणाऱ्या कलावंतांना, जेव्हा आदरांजली सोहळ्यात त्यांच्या रचना सादर करण्याची वेळ आली, तेव्हा कलावंतांचा उर भरून आला आणि शब्दरुपी दैवताला नमन करून कलावंत म्हणाला, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे..
मैत्री परिवार आणि विष्णुजी की रसोई यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य पद्मभूषण मंगेश पाडगावकर यांच्या काव्य प्रतिभेला आदरांजलीचा कार्यक्रम माझे जीवन गाणेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. गायक कलावंत गुणवंत घटवई यांनी आदरांजलीची सुरुवात तुझे गीत गाण्यासाठी या गीताने केली. सांग कसे जगायचे कन्हत कन्हत की गाणं म्हणत, असा बोध सर्वसामान्यांना देताना आयुष्य किती सुंदर आहे, त्याचे शब्दातीत वर्णन कवीने या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या गीतातून केले आहे. सारंग जोशीने हेच गीत त्यांच्या आदरांजली कार्यक्रमात सादर करून रसिकांच्या भावनांना हात घातला. पावसाच्या सरी बरसाव्यात तशा शब्दांच्या बरसणाऱ्या सरीत ओलेचिंब भिजवणाऱ्या पाडगावकरांनी काळानुरूप कवितेच्या वाटा शोधल्या. कधी परमेश्वराला शोधणारे पाडगावकर, प्रेमाचा शोध घेतानाही दिसतात. शब्दावाचून कळले सारे...जेव्हा तुझ्या बटांना... सावर रे सावर रे... दिवस तुझे हे फुलायचे या गीतातून प्रेमाचे बंध हळुवार उलगडतात. पाडगावकरांच्या अशाच एकाहून एक सुरेख रचना गीताच्या रूपात या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या. अमर कुळकर्णी, ईशा रानडे यांच्या सुरेल आवाजातून सादर झालेल्या गीतांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
विष्णू मनोहर आणि मिलिंद देशपांडे यांनी केलेल्या पाडगावकरांच्या कवितेचे वाचनाने रसिकजनांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. या कार्यक्रमात सचिन ढोमणे, विक्रम जोशी, अमर शेंडे, ऋग्वेद पांडे, आनंद मास्टे, महेंद्र ढोले यांनी वाद्यांवर साथसंगत केली. कार्यक्रमाचे संचालनात मुकुंद देशपांडे यांनी पाडगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला. (प्रतिनिधी)