चला.. ३१ मे रोजी तंबाखू सोडण्याची शपथ घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:07 AM2021-05-29T04:07:28+5:302021-05-29T04:07:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यावर्षी ३१ मे रोजी तंबाखू नकार दिन हा ‘तंबाखू सोडण्याची वचनबद्धता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी ३१ मे रोजी तंबाखू नकार दिन हा ‘तंबाखू सोडण्याची वचनबद्धता आणि त्यासाठीचे शपथपत्र’ या विषयावर आधारित आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे मोठ्या प्रमाणात ‘हॅशटॅग टोबॅको फ्री महाराष्ट्र’ मोहीम राबविली जाणार आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सोडण्यासाठी या दिवशी शपथ घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे.
महाराष्ट्र विशेषत: विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी तंबाखू सेवनामुळे हजारो नागरिकांना जीव गमवावा लागतो. ३१ मे हा तंबाखू नकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी व्यसनाच्या आहारी गेलेल्यांनी व्यसनमुक्तीचा ध्यास घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या एकूण संख्येत ६० टक्के लोक तंबाखू सेवनामुळे मृत पावतात. २०३० पर्यंत ही संख्या ८० पर्यंत जाण्याचे भाकीत केले गेले आहे. तंबाखू सेवनामुळे मधुमेह, कर्करोग, पक्षाघात, उच्च रक्तदाब, अंधत्व, श्वसनाचे आजार होण्याचा धोका संभवतो, तसेच कोरोना होण्याचा धोकाही वाढतो. तंबाखू सोडल्यास ८ तासांत ऑक्सिजन लेव्हल नॉर्मल होते. एक वर्षामध्ये हृदयरोग होण्याचा धोका निर्माण होतो.
बॉक्स
तंबाखू सोडायची...डायल करा टोल फ्री क्रमांक १८००-११-२३५६
तंबाखू सेवन इतर आजारांप्रमाणेच आहे. तुम्ही व्यसनाच्या आहारी गेले असल्यास व्यसनमुक्तीचा ध्यास घ्या. तंबाखूपासून होणाऱ्या आजारांपासून स्वत:चं रक्षण करा. तंबाखू सोडण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००-११-२३५६ यावर संपर्क करा, असे आवाहन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सर्वोपचार रुग्णालयाचे सदस्य देवेंद्र पातूरकर यांनी केले आहे.