चला कोरोनाला सुरक्षित व्यवहार शिकवू या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:07 AM2021-05-18T04:07:13+5:302021-05-18T04:07:13+5:30
नागपूर : तिसऱ्या लाटेत लहान मुलांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच त्यांच्या सवयींमध्ये बदल व्हावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोशल ...
नागपूर : तिसऱ्या लाटेत लहान मुलांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच त्यांच्या सवयींमध्ये बदल व्हावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोशल मीडियावर जनजागृती केली जात असून, त्यासाठी विविध संदेशात्मक पोस्टर्सचा वापर केला जात आहे. ही पोस्टर्स मुलांसोबतच पालकांचेही लक्ष वेधून घेत आहे.
कोरोनामुळे सर्वांनाच आपल्या जीवनशैलीत तसेच आपल्या सवयींमध्ये बदल करावा लागतो आहे. लहान मुलेही यातून कशी सुटणार? कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची वैद्यकीय तज्ज्ञांनी शक्यता व्यक्त केली आहे. या तिसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी तसेच पालकांना अधिक सजग करण्यासाठी व लहान मुलांमध्ये चांगल्या आरोग्यदायी सवयी निर्माण व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेने सोशल मोहीम सुरू केली आहे.
‘चला कोरोनाला सुरक्षित व्यवहार शिकवू या’, ‘नियमित मास्क लावा’, ‘घरी रहा सुरक्षित रहा’, ‘नियमित साबणाने हात धुवा’, ‘सुरक्षित अंतर ठेवा’ आदी विषयांवर लहान मुलांचे आकर्षक कार्टून असलेले डिजिटल पोस्टर्स, माहितीपूर्ण बाबींसह तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतीच्या सुमारे ९५० ग्रुपवर पाठवून जनजागृती करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे यांच्या मार्गदर्शनात काळजी, खबरदारी व उपाययोजनांचा प्रसार वेगाने करण्यासाठी जिल्हा परिषदेने माहिती, शिक्षण व संवाद या त्रिसूत्रीचा उपयोग केला आहे. याआधी मास्कचा नियमित व योग्य वापर, वैयक्तिक स्वच्छता, लसीकरण, म्युकरमायकोसिस आदी विषयांवर माहितीपूर्ण डिजिटल पोस्टर्स तयार करून ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे.
- सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात शहरासोबतच ग्रामीण भागातही वापर वाढला आहे. बहुतांशी लोकांकडे अॅन्ड्राईड मोबाईलही उपलब्ध आहे. सोशल मीडिया आजच्या काळात प्रभावी माध्यमही ठरत चालले आहे. त्यामुळेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्य विभाग व जिल्हा पाणी स्वच्छता मिशनतर्फे संयुक्तरित्या हा उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे.
-अनिल किटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता मिशन, जि.प.