अणेंच्या पत्रपरिषदेत ‘स्वाभिमानीं’चा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2016 02:44 AM2016-03-27T02:44:22+5:302016-03-27T02:44:22+5:30
ज्येष्ठ विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे हे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करीत असताना विदर्भविरोधकअसलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला.
११ जण ताब्यात : अखंड महाराष्ट्राच्या घोषणा
नागपूर : ज्येष्ठ विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे हे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करीत असताना विदर्भविरोधकअसलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी अजय हिवरकर यांच्यासह ११ जणांना ताब्यात घेतले.
राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे हे शनिवारी नागपुरात आले. दरम्यान, विदर्भवाद्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे धंतोली येथील टिळक पत्रकार भवनात त्यांचा पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्वाभिमानी संघटनेचे काही कार्यकर्तेही पत्रकार म्हणून घुसले. ५.३० वाजताच्या दरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करीत असतानाच स्वाभिमानीच्या एका कार्यकर्त्याने अणे यांना महाराष्ट्राचे तुकडे करून काय मिळणार, असा प्रश्न विचारला. यावर पत्रकारांनी त्यांना रोखले. पत्रकार नसल्याने तुम्ही प्रश्न विचारू शकत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते विदर्भविरोधी घोषणा देऊ लागले. लगेच विदर्भ समर्थकही स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देऊ लागले. काही वेळ दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू होती. त्यानंतर स्वाभिमानीचे कार्यकर्ते घोषणा देत बाहेर पडले. बाहेरही त्यांची नारेबाजी सुरूच होती.
यानंतर चर्चा पुन्हा सुरू झाली. पोलिसांना ही माहिती होताच ते लगेच घटनास्थळी आले. टिळक पत्रकार भवन परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला. त्यांनी घोषणाबाजी करीत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.(प्रतिनिधी)