नागपूर जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेटचा स्तर धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:30 AM2019-02-18T10:30:37+5:302019-02-18T10:32:20+5:30

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने २०१७-१८च्या अहवालात मान्सूननंतर रासायनिक मोहिमेचा अहवाल सादर केला आहे. यात नागपूर जिल्ह्याचा १३ तालुक्यातील ८५९२ पाण्याचे नमुने तपासले असता ५५०४ म्हणजे ६४ टक्के नमुने दूषित आढळले आहेत, तर ४५४९ नमुन्यामध्ये नायट्रेटची मात्रा जास्त आढळून आली आहे.

The level of nitrate in the water of Nagpur district is dangerous | नागपूर जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेटचा स्तर धोकादायक

नागपूर जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेटचा स्तर धोकादायक

Next
ठळक मुद्दे५५०४ नमुने दूषित ग्रामीणांचे आरोग्य धोक्यात

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने २०१७-१८च्या अहवालात मान्सूननंतर रासायनिक मोहिमेचा अहवाल सादर केला आहे. यात नागपूर जिल्ह्याचा १३ तालुक्यातील ८५९२ पाण्याचे नमुने तपासले असता ५५०४ म्हणजे ६४ टक्के नमुने दूषित आढळले आहेत, तर ४५४९ नमुन्यामध्ये नायट्रेटची मात्रा जास्त आढळून आली आहे. याची टक्केवारी ५३ टक्के एवढी आहे. दूषित पाण्यामुळे ग्रामीण लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पाण्यात अनेक प्रकारची खनिजे, वायू मिसळलेले असतात. पाण्यात हे सर्व पदार्थ अतिप्रमाणात एकत्र मिसळले गेल्यास पाणी प्रदूषित होते आणि ते आरोग्यास हानीकारक असते. खेड्यातील लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचे तर खेड्यांमध्ये आजही ७० टक्के लोक दूषित पाणी पितात. त्यामुळेच ग्रामीण क्षेत्रात पाण्यामुळे होणारे आजारांचे प्रमाणही अधिक आहे. म्हणूनच मान्सूनपूर्व व मान्सूननंतर पाण्याचे नमुने घेऊन ते तपासले जातात. नागपूर जिल्ह्यात नमुने तपासण्याची जबाबदारी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेची आहे. या विभागाने नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, हिंगणा, कुही, काटोल, नागपूर ग्रामीण, नरखेड, पारशिवनी, रामटेक, सावनेर, उमरेड, मौदा, कामठी, कळमेश्वर या १३ तालुक्यामधील एकूण ८५९२ पाण्याचे नमुने तपासले. यात ४५४९ पाण्याच्या नमुन्यांमध्ये नायट्रेट आढळून आले. ७८९ नमुन्यांमध्ये फ्लोराईड, २२४ नमुन्यांमध्ये आयर्न, ४४० नमुन्यांमध्ये ‘टीडीएस’, १३५ नमुन्यांमध्ये आम्लता, २४ नमुन्यामध्ये क्लोराईड तर ११० नमुन्यामध्ये सल्फेट आढळून आले आहे. असे असताना, हे नेहमीचे आहे, असे म्हणून जिल्हा परिषद याला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे.
नायट्रेटमुळे कॅन्सरचा धोका
तज्ज्ञानुसार, पाण्यात जर दहा मिलिपेक्षा अधिक नायट्रेट असल्यास तर लहान मुलांना ‘मिथॅमोग्लोबिनेमिआ’ हा आजार होतो. शरीर निळे पडते, आॅक्सिजन कमी होतो, त्यामुळे रुग्ण मुलाला कृत्रिम आॅक्सिजन लावावा लागतो तर मोठ्या माणसांना रक्तदाब, पोटदुखी, पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढण्यामागे कीटकनाशकांचा वाढता वापर हेही एक कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
७८९ पाण्याच्या नमुन्यात फ्लोराईड
प्रदूषित आढळून आलेल्या ५५०४ नमुन्यांमधील ७८९ नमुन्यांमध्ये फ्लोराईड आढळून आले आहे. याची टक्केवारी ११५.३ टक्के एवढी आहे. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे हाडे व दात ठिसूळ होतात. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते. पोटाचा विकार, लिव्हर, किडनी, हृदय कोशिकेवर परिणाम होतो.

नागपूर ग्रामीण भागातील ६४ टक्के पाण्याचे नमुने प्रदूषित आले तरी ८५ टक्के लोकांना पाईप लाईनमधून शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. ज्या स्रोतामधून पाण्याचे नमुने दूषित येतात, तिथे पिण्यायोग्य पाणी नसल्याचे फलक किंवा लाल रंग लावला जातो.
-विजय टाकळीकर,
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद.

४५४९ नमुन्यांत नायट्रेट
अहवालानुसार इतर तालुक्याच्या तुलनेत मौदामधील सर्वाधिक, ५८८ पाण्याच्या नमुन्यामध्ये नायट्रेट आढळून आले आहे. शिवाय, भिवापूरमध्ये ३३८, हिंगण्यामध्ये ४६७, कुहीमध्ये ४३७, काटोलमध्ये ११९, नागपूर ग्रामीणमध्ये ४२१, नरखेडमध्ये १०१, पारशिवनीमध्ये २२२, रामटेकमध्ये ६५१, सावनेरमध्ये ३७२, उमरेडमध्ये २६९, कामठीमध्ये २६२ तर कळमेश्वरमध्ये ३०२ असे एकूण ४५४९ नमुन्यामध्ये नायट्रेट आढळून आले आहे.

Web Title: The level of nitrate in the water of Nagpur district is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य