तृतीयपंथीयांना मिळणार हक्काची घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 09:12 PM2022-04-21T21:12:42+5:302022-04-21T21:15:57+5:30
Nagpur News तृतीयपंथीयांना लवकरच हक्काची घरे मिळतील, असे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
नागपूर : तृतीयपंथीयांना निवासाची सोय व्हावी व त्यांना हक्काची घरे मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येऊन तृतीयपंथीयांना लवकरच हक्काची घरे मिळतील, असे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
समाजकल्याण आयुक्त नागपूर दौऱ्यावर आले असता, त्यांनी सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व नागपूर सुधार प्रन्यासमधील पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. नागपूर सुधार प्रन्यासद्वारे चिखली व कळमना येथे तयार करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांच्या संकुलास भेट दिली. लवकरात लवकर शासनाकडे पाठपुरावा करून ही घरे तृतीयपंथीयांना वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रादेशिक उपायुकत डॉ. सिद्धार्थ गायकवाड, समाजकल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख व नागपूर सुधार प्रन्यासचे पदाधिकारी उपस्थित होते.
समाजकल्याणमध्ये सेवानिवृत्तांच्या प्रश्नांसाठी विशेष मोहीम
समाजकल्याण विभागामध्ये सेवा करून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी यांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत यासाठी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी विभागाच्या वतीने लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
समाजकल्याण आयुक्तालयाने विभागाच्या विविध संवर्गातील १६० कर्मचाऱ्यांना नुकताच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर केला आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांशी आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे संवाद साधला असता, तेव्हा त्यांनी ही माहिती दिली.