आम्ही आदराने केव्हा ओळखले जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 05:59 PM2019-03-26T17:59:31+5:302019-03-26T17:59:58+5:30

समाजाच्या आरंभापासूनच तृतीयपंथीयांचे अस्तित्व आहे, तरीदेखील आजही ते समाजबाह्यच आहेत अशी खंत सारथी व हमसफर या दोन संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली.

LGBTQ asked, When will we be called with respect? | आम्ही आदराने केव्हा ओळखले जाणार?

आम्ही आदराने केव्हा ओळखले जाणार?

Next
ठळक मुद्देएलजीबीटी समुदायाचा सामान्य नागरिकांना प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आम्हाला छक्का, मामू, लुक्खा या शब्दांसोबत केव्हापर्यंत आयुष्य काढावे लागणार आहे? आमची ओळख करून देताना हे समलैंगिक असून किंवा ते तृतीयपंथी असून त्यांचे नाव अमूक अमूक आहे असे म्हटले जाते. पण एखाद्या सामान्य स्त्री किंवा पुरुषाची ओळख करून देताना, हे हेट्रोसेक्शुअल आहेत, असे कधीच म्हटले जात नाही. तिथे त्यांचे स्त्री किंवा पुरुष असणे हे समाजमान्य व आदरयुक्तच असते. आमच्या बाबतीत मात्र समाज आमच्या लैंगिक आकर्षणाच्या प्राधान्यक्रमानुसार आम्हाला ओळखतो. वास्तविक समाजाच्या आरंभापासूनच तृतीयपंथीयांचे अस्तित्व आहे, तरीदेखील आजही ते समाजबाह्यच आहेत अशी खंत सारथी व हमसफर या दोन संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली.
एलजीबीटी या अल्पाक्षरी संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या समलैंगिक समाजाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या सारथी ट्रस्टचे अध्यक्ष आनंद चंद्राणी, सीईओ निकुंज जोशी व तृतीय पंथियांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या विद्या कांबळे यांनी या विषयावर परखड मते मांडली.
निकुंज जोशी यांनी, सेक्स आणि जेंडर यातला फरक विशद केला. यात जीवशास्त्रीय व समाजशास्त्रीय व्याख्यांमुळे उडणारा गोंधळ व त्याचा होणारा मनस्ताप कसा असतो यावर भाष्य केले. स्त्री पुरुष आणि इतर या तीन लिंगभेदांपैकी इतर या वर्गवारीत ५० हून अधिक उपवर्ग मोडतात. यात ट्रान्सजेंडर्स, ट्रान्ससेक्शुअल्स, क्वेश्चनिंग, इंटरसेक्स, ए सेक्शुअल असे अनेक उपवर्ग आहेत. या इतरांना निसर्गानेच तसे घडवले असते. तसे असण्यात या इतरांची स्वत:ची काहीच भूमिका वा इच्छा नसते. आपण वेगळे आहोत म्हणजे नेमके काय आहोत हे समजण्याचा त्यांचा संघर्ष फार मोठा असतो आणि त्याचसोबत त्यांना समाज व कुटुंबासोबतही संघर्ष करावा लागत असतो या वस्तुस्थितीची जाणीव निकुंज यांनी करून दिली.
यासंदर्भात सरकारच्या ठोस योजना असाव्यात, शिक्षण क्षेत्रात योग्य ते अभ्यासक्रम असावेत व सामाजिक रचनेत या इतरांना सामावून घेण्याच्या वाटा प्रशस्त असाव्यात अशी मांडणी केली. या सर्व वाटचालीत प्रसिद्धीमाध्यमांची भूमिका मोठी व मोलाची असते त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांतील प्रतिनिधींनीही आमच्या समुदायाबाबत नीट वास्तववादी माहिती जाणून घ्यावी असे आवाहन सारथी ट्रस्टचे संस्थापक आनंद चंद्राणी यावेळी केले.
विद्या कांबळे यांनी, अन्य राज्यांमध्ये तृतीयपंथी समाजासाठी अनेक चांगल्या योजना असून, त्याद्वारे त्यांची प्रगती होत असल्याची माहिती दिली. महाराष्ट्र सरकारनेही तृतीयपंथियांसाठी योजना आखाव्यात व राबवाव्यात असे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रसिद्धीमाध्यमांतील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.

 

Web Title: LGBTQ asked, When will we be called with respect?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.