लायसेन्सची मुदत संपली, अपॉइंटमेंट घेतलीय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:19+5:302021-06-10T04:07:19+5:30
नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा पार्श्वभूमीवर प्रशासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी ऑनलाईन कामकाजावर भर देण्यात ...
नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा पार्श्वभूमीवर प्रशासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी ऑनलाईन कामकाजावर भर देण्यात आला होता. विशेष म्हणजे, फिटनेस, परमिट, परवाना नोंदणी व इतर संबंधित कागदपत्रांची वैधता संपणाऱ्यांना ३० जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. आता १ जूनपासून शहर, पूर्व व ग्रामीण आरटीओ कार्यालये सुरू झाल्याने व महिन्याभराची मुदत असल्याने कार्यालयात गर्दी वाढली आहे. परंतु कार्यालयात येताना अपॉइंटमेंट घेऊनच येण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्गाला आळा बसावा यासाठी शासकीय कार्यालयांमधील मनुष्यबळ कमी करून २० टक्क्यांवर आणले होते. यामुळे नवे लायसेन्स, पर्मनंट लायसेन्स, लायसेन्सचे नूतनीकरण, आदी कामे खोळंबली होती. ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळत नसल्याने उमेदवार अडचणीत आले होते. याच दरम्यान परिवहन विभागाने फिटनेस, परमिट, परवाना नोंदणी व इतर संबंधित कागदपत्रांची वैधता संपणाऱ्यांना सुरुवातीला ३० सप्टेंबर २०२० मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र त्यावेळी कोरोनाचा धोका कायम असल्याने ही प्रक्रिया ३१ मार्च २०२१ पर्यंत आणि नंतर ३० जून २०२१ पर्यंत वाढवली. आता कोरोना नियंत्रणात येताच १ जूनपासून आरटीओच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
- नव्या परवानासाठी दीड महिन्याचा थांबा
लॉकडाऊनच्या काळात नव्या अपॉइंटमेंट थांबविण्यात आले होते. परंतु ज्यांनी त्यापूर्वीच लर्निंग किंवा पर्मनंटसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्या होत्या, त्यांचे रिशेड्युल करण्यात आले आहे. यांची संख्या मोठी असल्याने नव्या परवानाच्या अपॉइंटमेंटसाठी साधारण दीड महिना थांबावे लागण्याची शक्यता आहे.
-असा आहे कोटा
शहर आरटीओ कार्यालयात लर्निंग लायोन्ससाठी रोज १६०, तर पर्मनंट लायसेन्ससाठी २४० उमेदवारांचा कोटा आहे. सध्या हा कोटा फुल्ल दाखवीत असल्याने अपॉइंटमेंट मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.
कोट
ज्यांनी पूर्वी लर्निंग लायसेन्स किंवा पर्मनंट लायसेन्ससाठी अपॉइंटमेंट घेतली आहे, परंतु कोरोना काळात ऑनलाईन कामकाजामुळे त्यांना परीक्षा देता आली नाही अशा सर्वांचे अपॉइंटमेंट रिशेड्युल करण्यात आले आहे. तसा त्यांना मेसेज गेला आहे. कार्यालयात कोरोना नियमांचे पालन व्हावे व गर्दी वाढू नये यासाठी कोटा वाढविला जाणार नाही.
-विनोद जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर