मद्य खरेदीसाठी परवाना आवश्यकच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 01:47 PM2021-12-08T13:47:53+5:302021-12-08T14:06:32+5:30
दुकानातून मद्य खरेदी करताना आता प्रत्येक खरेदीदाराकडे मद्य सेवन परवाना आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. मद्य परवाना नसल्यास देशी मद्यासाठी २ रुपयांचा, तर विदेशी मद्यासाठी ५ रुपयांचा एक दिवसीय परवाना घेतल्यावरच मद्य दिले जाणार आहे.
नागपूर : शहर पोलीस परिमंडळ दोनच्या पथकाने रविवारी रात्री मद्य खरेदीचा परवाना नसलेल्यांना मद्य विक्री केल्याच्या आरोपाखाली तीन वाईन शॉपवर महाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात आला. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी पहिल्यांदाच कारवाई केल्यामुळे मद्य खरेदीसाठी परवाना आवश्यक असल्याची बाब पुन्हा उजेडात आली आहे. यापुढे परवाना नसलेल्या ग्राहकांना मद्य विक्री करणाऱ्या वाईन शॉपवर कारवाई करण्याचे सूतोवाच उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
दुकानातून मद्य खरेदी करताना आता प्रत्येक खरेदीदाराकडे मद्य सेवन परवाना आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. मद्य परवाना नसल्यास देशी मद्यासाठी दोन रुपयांचा, तर विदेशी मद्यासाठी पाच रुपयांचा एक दिवसीय परवाना घेतल्यावरच मद्य दिले जाणार आहे. मद्यविक्रीच्या दुकानदारांना दुकानाबाहेर याबाबत कायमस्वरुपी फलक लावण्याची सक्तीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. पण शहरातील २०० पेक्षा जास्त वाईन शॉप आणि बिअर शॉपीच्या दर्शनी भागात अशा प्रकारचे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे दुकानदार उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा दुकानदारांना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मद्य परवान्याची चौकशी दुकानदाराने करावी
देशी व विदेशी मद्य खरेदी करणे, मद्य जवळ बाळगणे आणि वाहतूक करणे यासाठी नियमानुसार मद्यपींनी परवाना घेणे आवश्यक आहे. शंभर रुपये भरल्यावर एक वर्षासाठी परवाना दिला जातो. आजीवन परवान्यासाठी एक हजार रुपये आकारण्यात येतात. मद्य खरेदी करणाऱ्याकडे परवाना आहे का, याची चौकशी दुकानदाराने करणे आवश्यक आहे. परवाना नसल्यास एक दिवसीय परवाना घेऊन मद्य खरेदी करण्याचे बंधन आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवान्याचे बुक दुकानदारांकडे ठेवलेले असतात. त्यानुसार मद्य खरेदी करणाऱ्याने देशी मद्यासाठी दोन रुपये आणि विदेशी मद्यासाठी पाच रुपयांचा एक दिवसीय परवाना घेण्याची सक्ती आहे. मात्र, या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी आदेश काढून या नियमाची कडक अंमलबजवणी करण्याचे आदेश याआधीच दिले आहेत.
अधिकाऱ्यांची जबाबदारी महत्त्वाची
प्रत्येक दुकानदाराने याबाबतचा कायमचा फलक तयार करून तो दुकानाबाहेर लावण्याचे सूचविण्यात आले आहे. दुकानदारांकडून या आदेशाचे पालन करण्यात येत आहे की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित विभागातील कार्यकारी अधिकाऱ्यांची आहे. दुकानाबाहेर फलक लावण्यात आलेला नसल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
परवाना नसलेल्यांना मद्य विक्री केल्याबद्दल पोलिसांनी दुकानदारांवर कारवाई केली. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. या दुकानदारांवर जिल्हा स्तरावर नियमभंगाची कारवाई करण्यात येईल. २५ वर्षांवरील ग्राहकाला परवाना देता येतो. गडचिरोली जिल्ह्यातील रहिवाशाला परवाना देता येत नाही, तर वर्धा येथील ३० वर्षांवरील रहिवाशाला वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे परवाना देता येतो. मुंबई, पुणेनंतर नागपुरात सर्वाधिक परवाने देण्यात आले आहेत.
मोहन वर्दे, उपायुक्त नागपूर विभाग, उत्पादन शुल्क विभाग.