बंदकाळातही शहरातील जनजीवन सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:06 AM2020-12-09T04:06:45+5:302020-12-09T04:06:45+5:30
नागपूर : शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेला भारत बंद नागपूर शहरात शांततेत पार पडला. बंद काळात कसलीही अनुचित ...
नागपूर : शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेला भारत बंद नागपूर शहरात शांततेत पार पडला. बंद काळात कसलीही अनुचित घटना घडली नाही, सर्व बाजारपेठाही सुरू होत्या. तसेच दैनंदिन व्यवहारही सुरळीत सुरू असल्याने शहरात बंदचा फारसा प्रभाव दिसला नाही.
या संपाला व्यापक प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा गृहीत धरून पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरात ठेवण्यात आला होता. प्रशासनाने आणि पोलीस विभागाने यासाठी उत्तम नियोजन केले होते. बंद शांततेत पार पडावा यासाठी पोलीस आयुक्त स्वत: प्रयत्नशील होते. बंदच्या पूर्वसंध्येला त्यांनी वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजकीय पक्ष, संघटना, आणि संपकर्त्या शेतकऱ्यांच्या समर्थकांनी हा बंद शांततेत पार पाडला.
बाजार समित्यांंचा संपूर्ण पाठिंबा या बंदला दर्शविण्यात आला होता. त्यामुळे त्याचा परिणाम पडला. वाहतूकदार संपात असल्याने मालाची आवक झाली नाही. शहरातील धान्य बाजारपेठा मात्र आज दुपारपर्यंत बंद होत्या. भाजीबाजार सुरळीत होता. बंदचे आवाहन करणाऱ्या संघटनांनी आणि प्रतिनिधींनी सामंजस्य दाखवत बंदसाठी शहरात बळजबरी केल्याच्या घटनांची नोंद नाही.
या बंदला अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता. नागपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याकडून बंदमध्ये शांततेत समर्थन करण्याचे आवाहन करण्यात आले. सकाळच्या सुमारास संविधान चौकामध्ये बंद समर्थकांनी एकत्रित येण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाकडून बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले जात होते. त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. शहरातील बाजारपेठा दिवसभर सुरू होत्या.
कोराडी नाका चौकात एकत्रित झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. वाहतूक सुरळीत सुरू होती. शहरातील ऑटोसेवाही रोजच्या प्रमाणेच सुरू असल्याने संपाचा दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम पडल्याचे जाणवले नाही.