सीपीडब्ल्यूडी कॉलनी येथील खुनात जन्मठेप
By admin | Published: December 31, 2016 03:02 AM2016-12-31T03:02:55+5:302016-12-31T03:02:55+5:30
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत काटोल रोडवरील सीपीडब्ल्यूडी कॉलनी येथे झालेल्या एका तरुणाच्या खूनप्रकरणी
नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत काटोल रोडवरील सीपीडब्ल्यूडी कॉलनी येथे झालेल्या एका तरुणाच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने एका आरोपीला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पप्पू ऊर्फ चंडिकाप्रसाद मोहनदत्त गौर (३५) रा. सीपीडब्ल्यूडी कॉलनी, असे आरोपीचे नाव आहे. रमण दुर्योधन मोहाडे (२५), असे मृताचे नाव होते. तो बोरगाव रोड येथील रहिवासी होता. प्रकरण असे की, १४ जुलै २०१३ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास पोलीस लाईन टाकळी येथे राहणारा अश्विन अशोक अवचार (२५) हा आपला मित्र रमण मोहाडे याला सोबत घेऊन पप्पू गौर याला भेटण्यासाठी सीपीडब्ल्यूडी कॉलनी येथे गेला होता. जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद होऊन पप्पू गौर याने रमणला खाली पाडून मारहाण केली होती. रस्त्याच्या बाजूला असलेल्या फरशीने त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्याचा जागीच खून केला होता.
अश्विन अवचार याच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी पप्पू गौर याला १५ जुलै २०१३ रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक सी. एम. गोडसे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक एस. आर. शर्मा, सहायक फौजदार रज्जाक शेख, नायक पोलीस सुनील कनोजे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)