बहुचर्चित निखिल मेश्राम खूनप्रकरणात सात आरोपींना जन्मठेप; ५ निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 11:24 AM2023-02-08T11:24:13+5:302023-02-08T11:25:46+5:30

सत्र न्यायालयाचा निर्णय; अलीकडच्या काळातील सर्वांत मोठी शिक्षा

Life imprisonment for seven accused in Nikhil Meshram murder case Nagpur | बहुचर्चित निखिल मेश्राम खूनप्रकरणात सात आरोपींना जन्मठेप; ५ निर्दोष

बहुचर्चित निखिल मेश्राम खूनप्रकरणात सात आरोपींना जन्मठेप; ५ निर्दोष

googlenewsNext

नागपूर : शांतीनगर येथील बहुचर्चित निखिल मेश्राम खूनप्रकरणामधील १२ पैकी ७ आरोपींना मंगळवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावण्यात आली, तर पाच आरोपींना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले. सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. गावंडे यांनी हा निर्णय दिला. गेल्या डिसेंबरमधील फाशीवगळता अलीकडच्या काळातील ही सर्वांत मोठी शिक्षा आहे.

शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये शंकर नाथू सोलंकी, देविलाल ऊर्फ देवा नाथू सोलंकी, सूरज चेतन राठोड, रमेश नाथूलाल सोलंकी, यश ऊर्फ गुड्डू हरीश लखाणी, मिखान नाथूलाल सालाड व मीना नाथूलाल सालाड यांचा समावेश आहे. विजय हरिचंद्र चव्हाण, गुड्डी लक्ष्मण राठोड, किरण ऊर्फ सुगना देविलाल सोलंकी, पिंकी नाथुलाल सोलंकी व रत्ना नाथूलाल सोलंकी हे पाच आरोपी निर्दोष सुटले आहेत. याशिवाय गीता चेतन राठोड, माया शंकर सोलंकी, राजुरी हरीलाल परमार व धनश्री रमेश सोलंकी हे चार आरोपी फरार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध खटला चालू शकला नाही. इतर आरोपींमध्ये ८ अल्पवयीन बालकांचा समावेश आहे. सर्व आरोपी एकमेकांचे नातेवाइक असून, ते बाबा रामसुमेरनगर येथील रहिवासी आहेत.

प्रेम प्रकरणातून घडली घटना

मृत निखिलचा भाऊ किरण ऊर्फ विक्की याचे आरोपींच्या नात्यातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यावरून आरोपींच्या मनात विक्कीविषयी राग होता. घटनेच्या एक दिवस आधी काही आरोपींनी किरणला मारहाण केली होती. त्यामुळे किरणने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्यानंतर आरोपींनी तडजोडीसाठी दबाव आणला. पण, विक्की व निखिलने त्यांना नकार दिला. परिणामी, २० मे २०१८ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास आरोपींनी निखिल व किरणवर लाकडी काठ्या, विटा, दगड, लोखंडी रॉड व कुऱ्हाड घेऊन हल्ला केला. निखिलच्या डोळ्यात मिरची पुड फेकून त्याला ठार मारले. तसेच, किरणलाही गंभीर जखमी केले.

निकालापर्यंतचा घटनाक्रम

  • घटना : २० मे २०१८
  • एफआयआर दाखल - २१ मे २०१८
  • आरोपपत्र दाखल - १८ ऑगस्ट २०१८
  • आरोप निश्चिती - २१ डिसेंबर २०२०
  • पुरावे तपासणी - २८ जानेवारी २००१
  • निर्णय राखीव - २३ डिसेंबर २०२२
  • निर्णय जाहीर - ७ फेब्रुवारी २०२३

...अशी आहे शिक्षा

कलम ३०२ (खून) : सर्वांना जन्मठेप व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास.

कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) : प्रत्येकी पाच वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास.

कलम ३२४ (शस्त्राने जखमी करणे) : प्रत्येकी एक वर्ष कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास.

कलम १४८ (सशस्त्र दंगा) : प्रत्येकी एक वर्ष कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास.

आरोपींविरूद्ध ठोस पुरावे

या खटल्यातील सरकारी वकील ॲड. प्रशांत साखरे यांनी शिक्षा झालेल्या आरोपींविरूद्ध ठोस पुरावे होते, अशी माहिती 'लोकमत'शी बोलताना दिली. खुनासाठी वापरण्यात आलेल्या कुऱ्हाडीवर आणि आरोपींच्या कपड्यांवर निखिलच्या रक्ताचे डाग आढळून आले. आरोपींना त्याचे स्पष्टीकरण देता आले नाही. किरणच्या प्रेमप्रकरणामुळे आरोपींकडे खून करण्याचा उद्देश होता. याशिवाय या घटनेचे पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांच्यासह एकूण १७ साक्षीदारांनी आरोपींविरूद्ध जबाब दिला, असेही ॲड. साखरे यांनी सांगितले.

Web Title: Life imprisonment for seven accused in Nikhil Meshram murder case Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.