नरखेडमधील हत्या प्रकरणात बापलेकासह तिघांना जन्मठेप
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 2, 2024 06:30 PM2024-05-02T18:30:46+5:302024-05-02T18:33:08+5:30
सत्र न्यायालयाचा निर्णय : दारू पिल्यानंतर झाले रक्तरंजित भांडण
नागपूर : दारू पिल्यानंतर भांडण झाले असता एका तरुणाची हत्या करणाऱ्या बापलेकासह तिघांना जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. पडवळ यांनी हा निर्णय दिला. ही घटना नरखेड पोलिसांच्या क्षेत्रातील आहे.
आरोपींमध्ये विलास जंगलू कवडती (४९), त्याचा मुलगा शुभम (२७) व पुतण्या नितेश बाळकृष्ण कवडती (३१) यांचा समावेश असून ते गोंडेगाव येथील रहिवासी आहेत. चौथा आरोपी रोहित रत्नाकर कवडती (२५) याचा हा खटला प्रलंबित असताना मृत्यू झाला. आरोपींनी हत्या केलेल्या तरुणाचे नाव रोशन शेषराव बनाईत होते. १८ जुलै २०२१ रोजी रात्री तो मित्र हमेश युगलसिंग बनाफर व माधव गणपत अलोणे यांच्यासोबत मिळून देविसिंग मरसकोल्हे यांच्या शेतात दारू पिण्यासाठी गेला होता. आरोपी विलासही त्यांच्यासोबत दारू पिला होता. त्यानंतर घरी परतताना रोशनने विलासला, त्याच्या मुलीने पळून लग्न केले, असे म्हटले. त्यामुळे विलासला राग आला. त्याने रोशनसोबत भांडण केले. तसेच, इतर आरोपींना बोलावून घेतले. दरम्यान, आरोपींनी रोशन, हमेश व माधव यांना लाठी, दगड व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. रोशन मार जिव्हारी लागल्यामुळे जाग्यावरच मरण पावला तर, इतर दोघे गंभीर जखमी झाले. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. विठ्ठल तामगाडगे व ॲड. लिलाधर शेंदरे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचे गुन्हे सिद्ध केले.
अशी आहे पूर्ण शिक्षा
१ - भादंवि कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास.
२ - भादंवि कलम ३२६ अंतर्गत चार वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास नऊ महिने अतिरिक्त कारावास.
३ - भादंवि कलम ३२४ अंतर्गत एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास.