कुख्यात दरोडेखोर दारासिंग बावरीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:26 AM2018-05-04T00:26:31+5:302018-05-04T00:26:41+5:30
मोक्का कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बहुचर्चित ठवकर ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील चौथा कुख्यात आरोपी दारासिंग ऊर्फ सतवनसिंग वकिलसिंग बावरी (४६) याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी गुरुवारी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोक्का कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बहुचर्चित ठवकर ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील चौथा कुख्यात आरोपी दारासिंग ऊर्फ सतवनसिंग वकिलसिंग बावरी (४६) याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी गुरुवारी हा निर्णय दिला.
बावरीला भादंविच्या कलम ३०२ (खून)अंतर्गत जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास तर, कलम ३९८ (सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न) व कलम १२०-ब (कट रचणे)अंतर्गत प्रत्येकी सहा वर्षे कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार महिने अतिरिक्त कारावास, अशी एकूण शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो अण्णाभाऊ साठेनगर झोपडपट्टी, मेहकर, जि. बुलडाणा येथील रहिवासी आहे. यापूर्वी २०१४ मध्ये न्यायालयाने आरोपी बन्नासिंग व जुल्फीसिंग यांना कमाल जन्मठेप तर, पंकेजसिंगला कमाल सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. बावरी घटनेच्या दिवसापासून फरार होता. त्याला २०१५ मध्ये अटक करण्यात आली व आवश्यक तपासानंतर त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारने न्यायालयात बावरीविरुद्ध १० साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे बयान व उपलब्ध पुराव्यांवरून बावरीविरुद्ध वरील गुन्हे सिद्ध झाले. इतर आरोपींविरुद्ध १७ साक्षीदार तपासण्यात आले होते.
हे प्रकरण हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीतील आहे. आरोपींनी शांत डोक्याने कट रचून ६ आॅक्टोबर २०१२ रोजी दुपारी १ च्या सुमारास मानेवाडा सिमेंट रोडवरील ठवकर ज्वेलर्सवर दरोडा टाकला होता. आरोपींकडे देशीकट्टा व अन्य घातक शस्त्रे होती. त्यांनी शोरुममध्ये शिरून कर्मचाऱ्यांना सोने, चांदी व अन्य मौल्यवान धातूंचे किमती दागिने बाहेर काढण्याची धमकी दिली. दुकान मालक विजय पांडुरंग ठवकर (३६) यांनी आरोपींचा विरोध केला. त्यामुळे जुल्फीसिंगने त्यांना देशीकट्ट्यातील गोळ्या झाडून ठार मारले. तसेच, कर्मचारी प्रसाद शरद खेडकर यांना आरोपींनी धारदार चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी लाखो रुपयांचा माल घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस शोरुममध्ये पोहोचले व आवश्यक कारवाई पूर्ण केली. सहायक पोलीस आयुक्त टी. बी. गौड यांनी प्रकरणाचा तपास केला. सत्र न्यायालयात सरकारतर्फे अॅड. विजय कोल्हे यांनी बाजू मांडली.