सासऱ्याची हत्या करणाऱ्या पोलिसाची जन्मठेप कायम, हायकोर्टाचा निर्णय
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: January 14, 2024 06:53 PM2024-01-14T18:53:36+5:302024-01-14T18:53:54+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील घटना
राकेश घानोडे/
नागपूर : वारंवार घरी येण्याच्या कारणावरून भांडण झाल्यानंतर सासऱ्याला बंदुकीची गोळी झाडून ठार मारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची जन्मठेप व इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय विनय जोशी व महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील आहे.
मनोज रामू गावडे (३९) असे आरोपीचे नाव असून घटनेच्या वेळी तो अहेरी येथे राहत होता. मृताचे नाव मारुती वारलू मट्टामी होते. गावडेला दारूचे व्यसन होते. तो पत्नी नीलिमासोबत नेहमी भांडण करीत होता. मट्टामीला नीलिमाची चिंता वाटत होती. त्यामुळे ते वेळोवेळी नीलिमाला भेटण्यासाठी जात होते. २३ जून २०२१ रोजी रात्री ८ च्या सुमारास आरोपी कर्तव्यावरून घरी आला. त्यावेळी मट्टामीला घरी पाहून आरोपी चिडला. त्याने मट्टामीसोबत भांडण केले.
दोघेही लवकरच हातापाईवर आले. दरम्यान, आरोपीने बंदुक काढून मट्टामीवर गोळी झाडली. परिणामी, मट्टामी जाग्यावरच ठार झाले. त्यानंतर आरोपीने नीलिमावरही गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. बंदूक हिसकावण्यात यशस्वी ठरल्यामुळे ती बचावली. २४ मार्च २०२३ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले हाेते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता त्याचे अपील फेटाळून लावले. सरकारच्या वतीने ॲड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.
नीलिमाने सरकारला सहकार्य केले नाही
पतीला शिक्षा होण्याची शक्यता लक्षात घेता नीलिमाने खटल्याच्या वेळी सरकार पक्षाला सहकार्य केले नाही. तसेच, बंदुकीतील गोळी मट्टामी यांना कशी लागली, याचे स्पष्टीकरण आरोपीने दिले नाही. असे असले तरी, परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला.