अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 08:39 PM2017-11-28T20:39:02+5:302017-11-28T20:47:17+5:30
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १२ वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका ५५ वर्षीय नराधमाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. के. कुळकर्णी यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १२ वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका ५५ वर्षीय नराधमाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. के. कुळकर्णी यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून १० हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
महादेव दमडूजी घोंगरे, असे आरोपीचे नाव असून तो पारशिवनी भागातीलच पेंढरी येथील रहिवासी आहे.
पीडित मुलगी ही एका पायाने अपंग होती. तिचे दुर्दैव असे की, सात वर्षांपूर्वी तिचे वडील मरण पावले होते. तिच्या आईने दुसरा घरोबा केला होता. त्यामुळे ती आपल्या आत्याकडे राहत होती.
घटनेच्या दिवशी २९ जून २०१३ रोजी आत्या आपल्या मुलीच्या सासरी गेली होती. त्यामुळे पीडित मुलगी आणि आत्याचा पती, असे दोघेच घरी होते. रात्री ९ वाजताच्या सुमारास संधीचा फायदा घेत पितातुल्य आरोपी महादेवने पीडित मुलीचे तोंड रुमालाने बांधून, ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर बरेच दिवस तो पीडित मुलीसोबत कुकर्म करीत राहिला. पीडित मुलीने आपल्या आजीचे गाव गाठून कर्म काहाणी कथित केली होती. पीडित मुलीच्या चुलत भावाने पारशिवनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताच पोलिसांनी भादंविच्या ३७६(२) (एफ) (आय), ५०६ आणि लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण कायद्याच्या ४,६,८,१० कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपीला १ जुलै २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. गोस्वामी यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपी महादेवला भादंविच्या कलम ३७६(२)(एफ)(आय) आणि पोक्सोच्या कलम ५ अन्वये जन्मठेप, १० हजार रुपये दंड आणि कलम ५०६ अंतर्गत ६ महिने कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील वर्षा आगलावे तर आरोपीच्या वतीने अॅड. मालोदे यांनी काम पाहिले. जिल्हा समन्वय अधिकारी उपनिरीक्षक डी. एन. मात्रे, सहायक फौजदार रमेश भुसारी, अरुण भुरे, हेड कॉन्स्टेबल भवानीप्रसाद मिश्रा, बाबूलाल राठोड, मुकुंद जयस्वाल यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.