‘आयुष्यमान भारत’चे पॅकेज कमी; २५ ते ३० टक्क्यांची तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:32 AM2019-06-21T11:32:43+5:302019-06-21T11:33:05+5:30
: केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’मध्ये महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील पॅकेजच्या तुलनेत साधारण २५ ते ३० टक्क्यांची तफावत आहे.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’मध्ये लाभार्थी रुग्णाला योजनेत समाविष्ट देशभरातील कुठल्याही रुग्णालयात उपचार घेता येतात. परंतु या योजनेत महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील पॅकेजच्या तुलनेत साधारण २५ ते ३० टक्क्यांची तफावत आहे. परिणामी, नागपुरात खासगी इस्पितळांमध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू होऊनही उदासीनतेचे सावट आहे. ‘पॅकेज’मध्ये हा भेदभाव का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात नागपूर जिल्ह्यात २३ सप्टेंबरपासून झाली. या योजनेत नागपूर शहरातील २ लाख ३९८ तर ग्रामीणमधील १ लाख ७६ हजार ९०३ असे मिळून ३ लाख ७७ हजार ३०१ पात्र कुटुंबीयांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा रुग्णालयातून ही योजना सुरू झाली, तर आता दुसºया टप्प्यात खासगी इस्पितळांचा समावेश करण्यात आला आहे.परंतु ज्या इस्पितळांमध्ये जन आरोग्य योजना राबविली जाते, त्याच इस्पितळांना आयुष्यमान भारत योजना राबविण्याचे आदेश आहेत. त्यामुळे नागपुरातील २६ इस्पितळांना याबाबत सामंजस्य करार करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र यातील तीन इस्पितळांनी ‘पॅकेज’ कमी असल्याच्या कारणावरून अद्यापही करार केला नाही; तर ज्या इस्पितळांनी करार केला आहे तिथे या योजनेतून फार कमी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे.
‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ केवळ शासकीय रुग्णालयातच
आयुष्यमान भारत योजनेतून ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत. खासगी इस्पितळांना या शस्त्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे, खासगी इस्पितळांच्या उदासिनतेला हेही एक कारण असल्याचे, बोलले जात आहे.
२६ खासगी हॉस्पिटलचा समावेश
आयष्युमान भारत योजनेचा करार मेयो, मेडिकल, डागा व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या शासकीयसह आशा हॉस्पिटल, गिल्लूरकर हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटल, महात्मे आय हॉस्पिटल, मोगरे हॉस्पिटल, एचसीजी एनसीआयएचआरआय, सूरज आय हॉस्पिटल, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठा, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट वेस्ट हायकोर्ट रोड, स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, कुणाल हॉस्पिटल, शुअरटेक हॉस्पिटल, न्यू ईरा हॉस्पिटल, अर्चनेगेल हॉस्पिटल, मेडिकल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व सारक्षी नेत्र हॉस्पिटल आदींनी केला आहे. तर अश्विनी डायलिसीस सेंटर, डॉ. के.जी. देशपांडे मेमोरिअल सेंटर व गेटवेल हॉस्पिटल अद्यापही करारापासून दूर आहेत.
बालरोग शल्यक्रियेत १५ हजारांचा फरक
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत ९७१ तर आयुष्यमान भारत योजनेत १३४९ उपचारांचा समावेश आहे. या दोन्ही योजनेतील ५८१ उपचार पद्धती सारख्या आहेत. आयुष्यमान भारत योजनेचे पॅकेज जन आरोग्य योजनेच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांनी कमी आहे. विशेषत: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी बालरोग शल्यक्रियेचे पॅकेज ३० हजारांचे आहे, तर मध्य प्रदेशातील रुग्णांसाठी हेच पॅकेज आयुष्यमान भारत योजनेत १५ हजारांचे आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातील रुग्णांत वाढ
मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून नागपुरात उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या पूर्वीपासूनच फार मोठी आहे. यातच आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्याला योजनेत समाविष्ट देशभरातील कुठल्याही रुग्णालयात उपचार घेण्याची मुभा आहे. यामुळे रुग्णांचा ओघ नागपूरकडे आणखीनच वाढला आहे. परंतु जनआरोग्य व आयुष्यमान भारत योजनेच्या पॅकेजमध्ये तफावत असल्याने रुग्णांना खर्चाचा ताळमेळ बसविणे खासगी रुग्णालयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.